मुंबई : नेपाळ-तिबेट परिसरात भूकंप, पूर आणि भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. केंद्र सरकारशी सातत्याने संपर्क साधला जात आहे. राज्यातील नागरिकांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी राज्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा २४ तास सतर्क असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
संर्पकासाठी १०७० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे.प्रशासनाकडे नेपाळला गेलेल्या सुमारे ८० नागरिकांची माहिती प्राप्त झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत चार पर्यटकांशी संपर्क झाला आहे. ते सुखरूप असल्याचे स्पष्ट झाले आहे. पूर आणि भूस्खलनामुळे नेपाळमधील दळणवळण व्यवस्था मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. मोबाईल नेटवर्क आणि दूरध्वनी सेवा खंडित झाल्याने अनेक पर्यटकांशी संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन महाजन यांनी केले.
रिचर्ड टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या दोन वाहनांमधून काही पर्यटक मानस सरोवरला गेले आहेत. त्यापैकी एका वाहनातील जवळपास ३७ पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. उर्वरित पर्यटकांशी संपर्क साधण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणांकडून प्रयत्न सुरू आहेत. नेपाळमध्ये गेलेल्या नागरिकांची जिल्हानिहाय माहिती संकलित करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. नागरिक किंवा नातेवाईकांकडे अतिरिक्त माहिती असल्यास ती प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मदतीसाठी राज्य नियंत्रण कक्षाचा १०७० हा टोल-फ्री क्रमांक उपलब्ध असून, ९१-९३२१५८७१४३ या क्रमांकावरही संपर्क साधता येईल. त्याचप्रमाणे controlroom@maharashtra.gov.in या ई-मेलवर माहिती देता येणार आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती नोंदवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ऑनलाइन लिंकही उपलब्ध करून दिली आहे.
