नेरळ-माथेरान रेल्वे सेवा दोन वर्षांनंतरही खंडितच ; रेल्वे मार्ग दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

२०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत नेरळ-माथेरान रेल्वे मार्गाचे मोठे नुकसान झाले होते.

हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग : नेरळ-माथेरान दरम्यान चालणारी मिनी ट्रेन सेवा गेल्या दोन वर्षांपासून खंडित आहे. रेल्वे मार्ग दुरुस्तीकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे पर्यटक तसेच स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. दुसरीकडे कमी प्रवासी क्षमतेने चालविण्यात येणाऱ्या शटल सेवेमुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे.

एकीकडे माथेरानच्या रेल्वे सेवेचा जागतिक वारसा यादीत समावेश व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे ही रेल्वे सेवा तोटय़ात असल्याचे सांगून बंद करण्याचा घाट घातला जात आहे. नेरळ-माथेरान दरम्यानची मिनीट्रेन सेवा गेली दोन वर्षे प्रशासकीय उदासीनतेमुळे बंद पडली आहे. माथेरानला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. यावेळी माथेरानची मिनी ट्रेन ही त्यांच्या आकर्षणाच्या केंद्र स्थानी असते. किमान एकदा तरी या रेल्वे सेवेचा आनंद लुटता यावा यासाठी त्यांची धडपड सुरू असते. मात्र गेली दोन वर्षे नेरळ ते माथेरान रेल्वे मार्ग नादुरुस्त असल्याने ही रेल्वे सेवा खंडित आहे. माथेरान करांसाठी ही रेल्वे सेवा जीवन वाहिनी म्हणून ओळखली जाते. माथेरानमध्ये वाहनांना बंदी असल्याने वाहतुकीचे प्रमुख साधन म्हणूनही मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीचे रेल्वे हे एक महत्त्वाचे साधन आहे.

२०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत नेरळ-माथेरान रेल्वे मार्गाचे मोठे नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी रूळही वाहून गेले होते. त्यामुळे रेल्वे सेवा खंडित झाली. मात्र रेल्वे मार्ग दुरुस्तीचे काम अद्यापही दोन वर्षांंनंतरही पूर्ण होऊ शकलेले नाही.

शटल सेवाही कमी प्रवासी क्षमतेने

नेरळ ते माथेरान दरम्यान रेल्वेसेवा खंडित असली तरी अमन लॉज ते माथेरान दरम्यान शटल सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र ही शटल सेवाही कमी क्षमतेनी सुरू असल्याने प्रवाशांना त्याचा फायदा होत  नाही. पूर्वी नेरळ-माथेरान रेल्वेसाठी गाडीला सहा डबे जोडले जात होते. आता मात्र शटल सेवेला दोन ते तीन डबे जोडले जात आहेत. त्यामुळे पर्यटकांना इच्छा असूनही रेल्वे तिकीट उपलब्ध होत नाही, अशा तक्रारी सातत्याने केल्या जात आहेत. जेमतेम ६० प्रवाशांनाच या शटल सेवेचा लाभ घेता येत आहे. सर आदमजी पिरभाय यांनी या रेल्वेची स्थापना १९०७ साली केली होती. २००७ मध्ये या रेल्वे सेवेने आपल्या स्थापनेची १०० वर्षे पूर्ण केली होती. २६ जुलै २००५ मध्ये झालेल्या प्रलयंकारी पावसात रेल्वेचे रूळ वाहून गेल्याने ही रेल्वे सेवा खंडित झाली होती. मात्र दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर ही रेल्वे सेवा सुरळीत करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले होते. त्यानंतर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत या रेल्वे सेवेचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र दुसरीकडे गेल्या दोन वर्षांपासून रेल्वे सेवा पुन्हा खंडित झाली आहे. रेल्वे सेवा कधी सुरू होईल हे सांगण्यास स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शवली आहे.

एकीकडे माथेरानच्या रेल्वे सेवेचा जागतिक वारसा यादीत समावेश व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आणि दुसरीकडे रेल्वे सेवा दोन वर्षे बंद आहे. किमान रेल्वे प्रशासनाने याची जाणीव ठेवून रेल्वे सेवा पूर्ववत करावी. रेल्वे सेवा खंडित असल्याने पर्यटक आणि स्थानिकांची मोठी गैरसोय होत आहे.

सुनील शिंदे, स्थानिक रहिवासी 

सुरुवातीला द्वितीय श्रेणीचे ३ डबे लावून शटल सेवा सुरू होती. आता मात्र एक डबा काढून ठेवण्यात आला आहे. यामुळे स्थानिक आणि पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. दिवाळीत माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघ लक्षात घेऊन शटल सेवेला जादा डबे जोडण्यात यावेत. तसेच नेरळ ते माथेरान रेल्वे सेवा तात्काळ सुरू करावी.

–   मनोज खेडकर,माथेरान काँग्रेस

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Neral matheran toy train service disrupted even after two years zws

ताज्या बातम्या