अहिल्यानगर:पोलिसांचा खबऱ्या असल्याचा आरोप करत तलवार, कुऱ्हाड, कोयता, चाकू व लाकडी दांडक्याने हल्ला करून नंतर बंदुकीची गोळी झाडून एकाच्या खूनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना आज, शनिवारी पहाटे नेवासे शहराजवळील साईनाथनगर भागातील नागफणी येथे घडली. पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली.

रमेश छगन भोसले असे जखमीचे नाव असून त्याला अहिल्यानगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती पोलीस निरीक्षक दराडे यांनी दिली. या घटनेत इंदू नारायण भोसले व सागर नारायण भोसले असे दोघे जखमी झाले आहेत. यासंदर्भात रमेश भोसले याची भावजय सपना शहाराम भोसले (वय ३२, रा. नागफणी, साईनाथनगर, नेवासा, अहिल्यानगर) यांनी नेवासा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी, जखमी व आरोपी हे परस्परांचे नातेवाईक आहेत. फिर्यादी व जखमी नागफणी भागात राहतात तर आरोपी नेवासा तालुक्यातीलच देवगडजवळ राहतात. आरोपींविरुद्ध यापूर्वीही शेवगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्यांना जामीन मिळाला होता. यापूर्वीही दोन्ही गटांमध्ये वाद झालेले होते. त्याच्या तक्रारी नेवासा पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

नागफणी भागात रमेश भोसले व त्याचा भाऊ शहाराम भोसले हे कुटुंबासह घरासमोर झोपेत असतानाच दहा जणांच्या आरोपींनी रमेश भोसले यास, ‘तू पोलिसांचा खबऱ्या होतो का?, तू पोलिसांना आमच्याबद्दल माहिती देतो का?, तुझा आता जीवच घेतो’, असे म्हणून तलवारीने, कुऱ्हाडीने, कोयत्याने हल्ला केला. नंतर जखमी रमेश भोसले याच्या पाठीत बंदुकीने गोळी झाडली.

रमेश भोसले याला वाचवण्यासाठी कुटुंबातील महिला व इतर सदस्य मध्ये पडले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. नंतर आरोपी पळून गेले. जखमी रमेश भोसले याला प्रथम नेवासा फाटा येथे व नंतर नगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल पवार करत आहेत.