अहिल्यानगर: नेवासा (जिल्हा अहिल्यानगर) शहरातील मोकाट कुत्रे आणि मोकाट जनावरांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले असून, प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ आज, सोमवारी नागरिकांनी नगरपंचायतीवर मोर्चा काढला. मोकाट कुत्र्यांनी शाळकरी मुलांसह अनेकांना चावा घेतल्याच्या घटना घडूनही प्रशासन केवळ आश्वासने देत असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. यावेळी अधिकाऱ्यांना बांगड्या आणि साडी देऊन निषेध नोंदविण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते शांताराम गायके, शिवा राजगिरे, विकास चव्हाण यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. नेवासा पंचायत समितीच्या प्रवेशद्वारापासून सुरू झालेला मोर्चा मुख्य रस्त्याने नगरपंचायत कार्यालयावर धडकला. मोर्चेकऱ्यांनी मुख्याधिकारी कार्यालय गाठले; मात्र मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. शहरातील गंभीर प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी जबाबदार अधिकारी कार्यालयात हजर राहत नसतील, तर नागरिकांनी दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. नगरपंचायतीला तातडीने कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली.
यानंतर मोर्चेकऱ्यांनी नगराध्यक्षांच्या दालनात उपस्थित असलेले कार्यालयीन अधीक्षक सागर झावरे यांना घेराव घालून मोकाट कुत्रे आणि जनावरांच्या बंदोबस्ताबाबत जाब विचारला. अनेक महिन्यांपासून हा प्रश्न सतावत असताना प्रशासनाने ठोस पावले का उचलली नाहीत, असा संतप्त प्रश्न करण्यात आला. यावेळी शांताराम गायके यांनी साडी व बांगड्यांचा कार्यालयीन अधीक्षक सागर झावरे यांना आहेर देत प्रशासनाच्या कारभाराविरोधात निषेध व्यक्त केला.
नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी मोर्चेकऱ्यांच्या प्रश्नांशी सहमती दर्शवत तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी जागेची पाहणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले तसेच बाहेरील व्यक्ती शहरात मोकाट कुत्रे आणून सोडत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पुलाच्या परिसरात सीसीटीव्हीच्या माध्यमातून संबंधितांवर कारवाई करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
मोर्चात आम आदमी पक्षाचे ॲड. संजय सुखदान, अल्ताफ पठाण, बंडू आलवणे, विकास पोतदार, अनिल सोनवणे, योगेश वर्मा, राहुल मुंडलिक, रुपेश उपाध्ये, सुलेमान मणियार, भाजपचे मनोज पारखे, गफुरभाई कुरेशी, इम्रान दारुवाले, कुणाल मांडण, जमिर बागवान, इम्रान पटेल सरफराज पठाण आदी सहभागी झाले.
