लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : जिल्ह्यात करोना रुग्णवाढीचे सत्र सुरूच असून, दिवसभरात २६ नवे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १५३६ झाली. दरम्यान, आज १८ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

अकोला जिल्ह्यात करोनाचा प्रसार सातत्याने वाढतच आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मृत्यूच्या प्रमाणातही वाढ झाली. सुदैवाने आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. आतापर्यंत ७७ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात एका आत्महत्येचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण ३५७ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी ३३१ अहवाल नकारात्मक, तर २६ अहवाल सकारात्मक आले आहेत. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आज रुग्ण वाढ मंदावल्याचे चित्र होते. सध्या ३६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १०९३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यात आज सुट्टी देण्यात आलेल्या १८ जणांचा समावेश आहे.

आज दिवसभरात २६ जणांचे अहवाल सकारात्मक आले. त्यात सकाळी आढळून आलेल्या २२ रुग्णांमध्ये १० महिला व १२ पुरुष आहेत. त्यातील गजानन नगर, कळंबेश्वार येथील प्रत्येकी चार जण, गाडगेनगर तीन जण, हरिहर पेठ, सिंधी कॅम्प प्रत्येकी दोन जण, तर दगडीपूल, अकोटफैल, अयोध्यानगर, डाबकीरोड, आदर्श कॉलनी, कामा प्लॉट व विठ्ठल मंदिर परिसर येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. सायंकाळी अहवालात आणखी चार बाधित आढळले. त्यामध्ये दोन पुरुष व दोन स्त्री रुग्णांचा समावेश आहे. ते हरिहरपेठ, दगडीपूल, तारफैल व अकोट येथील रहिवासी आहेत.

नऊ हजारावर अहवाल नकारात्मक
आजपर्यंत एकूण १०७४९ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १०३८८, फेरतपासणीचे १४४ तर वैद्याकीय कर्मचाऱ्यांचे २१७ नमुने होते. आजपर्यंत एकूण १०६९० अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण नकारात्मक अहवालांची संख्या ९१५४, तर सकारात्मक अहवाल १५३६ आहेत.
दुर्धर आजारग्रस्तांची तपासणी मोहीम
शहरातील कोरोनाग्रस्तांचा वाढता संसर्ग बघता दुर्धर आजारग्रस्त रुग्णांवर विशेष लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन तसेच अकोला शहरातील डॉक्टर संघटनांच्या संयुक्त विद्यामाने १ ते ४ जुलै दरम्यान विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत विनामूल्य तपासणी केली जाणार आहे.
प्लाझ्मा युनिट कार्यान्वित
प्लाझ्मा थेरमीचे युनिटचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून करण्यात आले. ऑनलाइन पद्धतीने झालेल्या कार्यक्रमात अमरावती येथून पालकमंत्री बच्चू कडू, तर अकोल्यातून अधिकारी सहभागी झाले होते. जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत स्थापन करण्यात आलेल्या युनिटमधूनही रक्तदाते व डॉक्टर्स सहभागी झाले.