सोलापूर : ‘लोकसत्ता’ने गेल्यावर्षी गणेशोत्सवात राबविलेल्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाला वाचकांनी दिलेल्या उदंड आर्थिक मदतीतून सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ येथील बोलवाडी प्रकल्पासाठी नवीन वास्तू उभारण्यात येत आहे. या वास्तूचे भूमिपूजन गुरुवारी कौटुंबिक जिव्हाळय़ाच्या वातावरणात करण्यात आले. ‘लोकसत्ता-सर्वकार्येषु सर्वदा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या नियोजित वास्तूमध्ये सोलापूर जिल्ह्याबाहेरील व परराज्यातील कर्णबधिर मुलांना पालकांसह निवास व्यवस्थेसह नैसर्गिकपणे ‘स्पीच थेरपी’चे शिक्षण दिले जाणार आहे.

या नव्या वैशिष्टय़पूर्ण दिमाखदार वास्तूचे बांधकाम २८९८ चौरस फुटाचे असून त्यासाठी २२ लाख ४७ हजार ९१० रुपये खर्चाचा आराखडा तयार आहे. हा संपूर्ण आर्थिक निधी ‘लोकसत्ता’च्या सर्वकार्येषु सर्वदा उपक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. या वास्तूचे बांधकाम येत्या पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणार आहे. या नियोजित वास्तूचे भूमिपूजन सोलापूरच्या प्रीसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते करण्यात आले. दोन मजली असलेल्या या नियोजित वास्तूत दरवर्षी २४ कर्णबधिर मुलांना नैसर्गिक स्पीच थेरपी शिक्षणाच्या माध्यमातून बोलते करण्यात येणार आहे. कर्णबधिर मुलांसह त्यांच्या पालकांसाठीही निवासव्यवस्था उपलब्ध होणार आहे.

अशा प्रकारे प्रयोग करणारी शेटफळची व्हॉईस ऑफ दी व्हॉईसलेस अभियान ही दुर्मीळ संस्था आहे. योगेश भांगे आणि त्यांच्या पत्नी जयप्रदा भांगे यांच्याकडून ही संस्था आणि बोलवाडी प्रकल्प यशस्वीपणे पुढे नेण्यात येत आहे.  इतर संस्था फक्त बालकांना निवासी ठेवतात. मात्र पालक सोबत नसल्याने त्यांची भाषावाढ होत नाही. परिणामी सरकारी शाळेतून दहावी पास झालेली बालके देखील मुकीच राहतात. म्हणून बालके बोलण्याची हमी घेणारी ही दुर्मीळ संस्था ठरली आहे. दोन मजली असलेल्या या नियोजित वास्तूसाठी लाल जांभा कोकणी दगड वापरण्यात येणार असून त्यात सिमेंट जंगल राहणार नाही. भूमिपूजन सोहळय़ास प्रगतशील शेतकरी रमेश कचरे, संतोष कचरे, प्रीसिजन फाउंडेशनचे माधव देशपांडे, संदीप पिसके, ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ प्रतिनिधी एजाजहुसेन मुजावर,दोभाडा, क्षितिज शहा, तानाजी इंगळे ,नवनाथ शिंदे ,धनाजी लोहार, बाळू दांडगे, दीपक कुंभार आदी उपस्थित होते.