राज्यात एकीकडे मुसळधार पावसानं थैमान घातलेलं असताना दुसरीकडे करोना देखील राज्यावरची आपली वक्रदृष्टी अजिबात कमी करायला तयार नाही. गेल्या २४ तासांच्या राज्यातील आकडेवारीचा विचार करता नव्या करोनाबाधितांचा आकडा जरी अजूनही नियंत्रणात असला, तरी मृतांचा आकडा मात्र कमी होण्याचं नाव घेत नाहीय. आज दिवसभरात राज्यात तब्बल १६७ करोना मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर आता थेट २.०९ टक्के इतका झाला आहे. आजच्या मृतांच्या आकडेवारीमुळे राज्यात आत्तापर्यंत करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ३१ हजार २०५ च्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे नवे करोनाबाधित जरी कमी असले, तरी मृतांचा आकडा ही राज्य सरकार आणि आरोग्य प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरली आहे.

 

आज दिवसभरात राज्यात नव्याने नोंद झालेल्या करोनाबाधितांची संख्या ६ हजार ७५३ इतकी आहे. गुरुवारपेक्षा हा आकडा जरी कमी असला, तरी त्याच तुलनेत बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा देखील कमी झाला आहे. गुरुवारी ७ हजार ३०२ नवे करोनाबाधित सापडले होते. मात्र, त्यासोबतच ७ हजार ७५६ रुग्ण बरे देखील झाले होते. मात्र, आज ही संख्या कमी होऊन ५ हजार ९७९ इतकी झाली आहे. राज्यात आजपर्यंत सापडलेल्या करोनाबाधितांचा आकडा आता ६२ लाख ५१ हजार ८१० इतका झाला आहे तर आजपर्यंत ६० लाख २२ हजार ४८५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.