Aaditya Thackeray And Shrikant Shinde : विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतरही महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा पेच अजून सुटला नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसल्याचे बोलले जात आहे. अशात भाजपाचा मुख्यमंत्री झाला तर एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होतील, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर आता शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) खासदार नरेश म्हस्के यांनी स्पष्टीकरण दिले आहे. म्हस्के यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदाचा कोणताही संबंध नसल्याचे सांगितले आहे. याचवेळी त्यांनी अदित्य ठाकरे यांना तर मुख्यमंत्री व्हायचे होते, असे म्हणत टोला लगावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते…

शिवसेना (एकनाथ शिंदे) श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करणार असल्याच्या चर्चेबद्दल विचारण्यात आले तेव्हा खासदार नरेश म्हस्के म्हणाले, “श्रीकांत शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात येणार असल्याचे माध्यमांमध्ये बोलले जात आहे, त्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. श्रीकांत शिंदे आणि अदित्य ठाकरे यांच्यामध्ये तुलना होऊ शकत नाही. अदित्य ठाकरे पहिल्यांदाच दुसऱ्या मतदारसंघातून निवडून आले आणि कॅबिनेट मंत्री झाले. त्यांना तर मुख्यमंत्री व्हायचे होते. श्रीकांत शिंदे हे तिसऱ्या टर्मचे खासदार आहेत. त्यांचा आणि उपमुख्यमंत्रीपदाचा संबंध नाही. श्रीकांत शिंदे यांच्याकरता आम्ही उपमुख्यमंत्रीपद मागितलेले नाही. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.”

गृहमंत्रीपदाचा तिढा नाही

खासदार नरेश म्हस्के यांना आज महायुतीच्या नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर होणाऱ्या बैठकीबाबत आणि गृमंत्रीपदाच्या तिढ्याबाबत विचारण्यात आले. तेव्हा नरेश म्हस्के म्हणाले, “महायुती भक्कम आहे. आमच्यामध्ये असा कोणत्याही प्रकारचा तिढा नाही. काल एकनाथ शिंदे यांनीही यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह आणि महायुतीचे नेते जे. पी नड्डा जो काही निर्णय घेतील त्याच्याशी सहमत असल्याचे आम्ही आधीच जाहीर केले आहे.”

हे ही वाचा : “शेवटी भाजपा सांगेल तेच करावे लागणार…” मनसेचा माजी आमदार एकनाथ शिंदेंबाबत काय म्हणाला? ईव्हीएमवरही उपस्थित केले प्रश्न

महायुतीला स्पष्ट बहुमत

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला २३५ जागा मिळाल्या आहेत. यामध्ये भाजपाने सर्वाधिक १३२ जागा जिंकल्या आहेत. त्यानंतर शिवसेनेने (एकनाथ शिंदे) ५७ आणि राष्ट्रवादीने (अजित पवार) ४१ जागा जिंकल्या आहेत. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून एक आठवडा उलटला असून, महायुतीतून कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New dcm of maharashtra shrikant shinde adity thackeray shivena mp naresh mhaske eknath shinde aam