राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सामान्य स्वयंसेवकाच्या घरी मुक्काम करून सकाळी दीनदयाल शोध संस्थेच्या कार्यालयात नित्य शाखेला हजेरी लावली. शाखेनंतर संघाशी संबंधित विविध संस्था आणि संघटनांच्या प्रमुख दीडशे पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधल्याने स्वयंसेवकांमध्ये नवी ‘ऊर्जा’ निर्माण झाली.

जिल्ह्यत मुक्काम करणारे भागवत हे दुसरे सरसंघचालक ठरले. जुन्या स्वयंसेवकांकडून पूर्वीच्या सरसंघचालकांच्या भेटीच्या, सहवासाच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.  राष्ट्रसंत भय्यूमहाराज यांच्या सूर्योदय परिवारातर्फे येथे शनिवारी मानवतेचा महाकुंभ कार्यक्रमास सरसंघचालक भागवत आले होते. शुक्रवारी सायंकाळी आलेल्या भागवत यांनी संघाचे स्वयंसेवक कुलदीप धुमाळे यांच्या निवासस्थानी मुक्काम केला. सरसंघचालक मुक्कामी राहणार असल्याने धुमाळे यांच्या मर्मबंध घराला छावणीचे स्वरूप आले होते. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे भागवत यांनी योगाभ्यास केला.

त्यानंतर सकाळी साडेसातला पांगरी रस्त्यावरील दीनदयाल शोध संस्थेच्या संघशाखेत हजेरी लावली. शाखेनंतर संघाशी निगडित बजरंग दल, विश्व िहदू परिषद, भाजप या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. दुपारी मोंढा भागातील पटेल यांच्या निवासस्थानी भेट देऊन सूर्योदय परिवाराच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. कुलदीप धुमाळे यांच्या कुटुंबीयांची भागवत यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. पाटबंधारे विभागातील निवृत्त अभियंता धुमाळे हे संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक असून काही वर्षांपूर्वी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सभेत त्यांनी ‘वंदे मातरम्’ हे गीत गायले. त्या वेळी आचारसंहितेचा भंग केल्यावरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. जिल्ह्यत यापूर्वी सरसंघचालक गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, सुदर्शन, रज्जूभय्या आणि मोहन भागवत या सरसंघचालकांनी भेटी दिल्या आहेत. सर्वच सरसंघचालक सार्वजनिक ठिकाणी न थांबता स्वयंसेवकाच्या घरी मुक्कामी थांबतात, ही परंपरा आहे. भागवत यांच्या भेटीने संघाच्या स्वयंसेवकांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली.