राज्य काँग्रेसमधील नवे मुस्लीम नेतृत्व; डॉ. वझाहत मिर्झा अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी आमदार डॉ. वझाहत मिर्झा यांची नियुक्ती करण्यात आली.

नितीन पखाले

 यवतमाळ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी आमदार डॉ. वझाहत मिर्झा यांची नियुक्ती करण्यात आली. घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना वयाच्या अवघ्या ४७व्या वर्षी काँग्रेसपक्षात स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून तब्बल सहा महत्त्वाच्या पदांवर विराजमान असलेले आ. डॉ. वझाहत मिर्झा हे जिल्ह्यात रसातळाला गेलेल्या काँग्रेसचे तारणहार होऊ शकतात का? किंवा त्यांच्यामुळे राज्यात काँग्रेसला काही फायदा होऊ शकतो का, अशी चर्चा या नियुक्तीच्या निमित्ताने सुरू झाली आहे. 

प्रदेश काँग्रेसमध्ये नसीम खान, हुसेन दलवाई, मुझ्झफर हुसेन, अमिन पटेल, अस्लम शेख हे काँगेसमधील प्रचलित नेतेमंडळी. पक्षात पदे देण्याची वेळ येते तेव्हाच याच नावांचा विचार व्हायचा. त्यातूनच यवतमाळचे डॉ. वझाहत मिर्झा यांना विधान परिषदेची आमदारकी मिळाली तेव्हा साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. आता प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. यावरून काँग्रेसने डॉ. मिर्झा यांच्या रूपाने अल्पसंख्याक समूहात नवे नेतृत्व पुढे आणले आहे. 

पुसद येथील रहिवासी असलेले डॉ. वझाहत यांचे वडील आथर मिर्झा हे शिक्षक होते. ते पुसद येथे एक साप्ताहिक चालवायचे. वझाहत यांचे शालेय शिक्षण पुसद येथे झाल्यानंतर त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. वडील काँग्रेस विचारधारेचे असले तरी घरात राजकीय पार्श्वभूमी नव्हती. मात्र काँग्रेसचे  नेते गुलामनबी आझाद हे १९८० मध्ये काँग्रेसकडून वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढले व जिंकले. या काळात गुलामनबी यांचा आथर मिर्झा यांच्याशी स्नेह जुळला आणि पुढे गुलामनबी आझाद हे मिर्झा परिवाराचे राजकीय गॉडफादरच झाले. वझाहत यांच्या वडिलांनी त्या काळात अल्पसंख्याक समाजाशी निगडित अनेक शैक्षणिक संस्थाची उभारणी केली. गुलामनबी आझाद यांच्या नावानेच या कुटुंबीयांच्या अनेक संस्था आहेत. आथर मिर्झा यांच्या निधनानंतर ही जबाबदारी डॉ. वझाहत यांच्याकडे आली आणि त्यांनी वडिलांपेक्षा एक पाऊल पुढे टाकत राजकारणात प्रवेश केला. गुलामनबी आझाद यांचे बोट धरून वझाहत यांनी थेट दिल्ली गाठली. अल्पसंख्याक समाजातील एक उच्चशिक्षित तरूण म्हणून काँग्रेसनेही डॉ. वझाहत मिर्झा यांना जवळ केले. पक्षासाठी आंदोलने, कार्यकर्त्यांची फळी अशी कोणतीही पार्श्वभूमी नसताना डॉ. मिर्झा काँग्रेसचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष झाले.

२०१८ मध्ये डॉ. वझाहत मिर्झा यांना काँग्रेसने थेट विधान परिषदेची उमेदवारी दिली व ते अविरोध निवडून आले. गुलामनबी आझाद यांचे मार्गदर्शन आणि काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची साथ यामुळे डॉ. मिर्झा आमदार झाले. राज्यमंत्री दर्जा असलेल्या वक्फ बोर्डाचे अध्यक्ष, यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष, अल्पसंख्याक समाजासाठी स्वतंत्र शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी नेमलेल्या अभ्यासगटाचे सदस्य अशा अनेक पदांवर डॉ. मिर्झा सध्या कार्यरत आहेत. मात्र त्यांच्या पदांमुळे रसातळाला गेलेल्या काँग्रेसला किती फायदा होईल, हा चिंतनाचाच विषय आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: New muslim leadership state congress state president minorities department ysh

Next Story
कोंढाणे धरणाच्या पाण्यावरून राजकारण तापले; सिडकोला धरण देण्यास माजी आमदार सुरेश लाड यांचा विरोध, भाजपचा राष्ट्रवादीच्या सुरात सूर
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी