मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचे वेतन हे नवीन वेतनवाढीनुसार देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्याचे परिपत्रकच महामंडळाने जारी केले असून नवनियुक्त ते दहा र्वष कालावधी झालेल्या कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये वाढ मिळणार आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन हे दर महिन्याच्या सात तारखेला होते. जे कर्मचारी कर्तव्यावर आहेत, त्यांनाच नवीन वेतनवाढ मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महामंडळाने काढलेल्या परिपत्रकात सुधारित वेतनवाढीनुसार नव्याने नियुक्ती मिळालेल्या आणि १० वर्षांच्या  कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपयांची वाढ केली आहे. १० ते २० वर्षांपर्यंतची सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना ४,००० रुपयांची पगारवाढ, तसेच २० वर्षांपेक्षा अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना २ हजार ५००० रुपये पगारवाढ दिल्याचे नमूद केले आहे. याशिवाय २८ टक्के  महागाई भत्ताही देण्यात येणार आहे. दरम्यान, एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने संप सुरूच आहे. महामंडळात बुधवारी ९२ हजार २६६ पैकी फक्त १८ हजार ६९४ कर्मचारी कामावर हजर राहिले. कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी महामंडळाने सुधारित वेतनवाढीची माहिती कर्मचाऱ्यांना देण्यासाठी एक परिपत्रकच काढले आहे. महामंडळाने कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरूच ठेवली आहे. बुधवारी ४४८ कर्मचारी निलंबित केले. त्यामुळे एकूण निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या ८ हजार ६४३ झाली आहे. तसेच रोजंदारीवरील ६५ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त झाली. आतापर्यंत १ हजार ८९२ कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई केली आहे. दिवाळीच्या काळात जवळजवळ ८० टक्के वाहतूक सुरळीत सुरू होती. त्यावेळी नुकत्याच झालेल्या दरवाढीमुळे तिकीट विक्रीतून मिळणारा महसूल प्रतिदिन १५ कोटींपर्यंत पोचला होता. परंतु ७ नोव्हेंबरनंतर संपाची तीव्रता वाढली आणि  सर्वच डेपो बंद झाले. त्यामुळे एसटीचा महसूल कोटीतून हजारात पोचला. सध्या दिवसभरात १ हजारपेक्षा जास्त बसेस रस्त्यावर धावत असून यामुळे सुमारे दीड लाखपेक्षा जास्त प्रवासी दररोज प्रवास करीत आहेत. यातून एसटीला ७० ते ७५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New pay hike for st employees implemented in maharashtra zws
First published on: 02-12-2021 at 03:03 IST