अहिल्यानगर: नेवासा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षांचे पती ॲड. संजय सुखधान यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचे तीव्र पडसाद आज, सोमवारी नेवासा शहरात उमटले. सर्वपक्षीय तसेच विविध संघटनांनी एकत्र येत आयोजित केलेल्या शहर बंदला चांगला प्रतिसाद मिळाला तसेच सुखधान यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घ्यावा, या मागणीसाठी मोर्चाही काढण्यात आला.

नेवासा नगरपंचायतचे मुख्याधिकारी निखिल फराटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संजय सुखधान यांच्या विरोधात फराटे यांच्यावर गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फराटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, नंतर तो तपासासाठी नेवासा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. हा गुन्हा खोटा असल्याचा आक्षेप घेत सर्वपक्षीयांनी आज नेवासा शहर बंद ठेवले. त्यामध्ये व्यापारीही सहभागी झाले. ॲड. संजय सुखधान हे उपनगराध्यक्ष शालिनी सुखदान यांचे पती तसेच आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आहेत.

मोर्चात बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, आपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आघाव, उपनगराध्यक्ष शालिनी संजय सुखधान, भाजप शहराध्यक्ष मनोज पारखे, भाजप नगरसेवक निरंजन डहाळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पठारे, व्यापारी संघटनेचे कुणाल मांडण, गणेश चौगुले, शांताराम गायके, आरपीआयचे संजय बनसोडे, नगरसेवक स्वप्निल मापारी, संतोष राजगिरे, येदुभाऊ सोनवणे आदी सहभागी झाले होते.

मोर्चेकरांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले. संबंधित गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करण्याचे आश्वासन या अधिकाऱ्यांनी दिले. ॲड. सुखधान यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा तात्काळ मागे घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा अधिक तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

नेवासा नगरपंचायतीतील कथित भ्रष्टाचार, अवैध कारभार, पाणीपुरवठा व स्वच्छतेसाठी दाखवण्यात आलेला खर्च व प्रत्यक्ष झालेले काम यातील तफावत, यावर ॲड. सुखधान यांनी सातत्याने आवाज उठवला. मुख्याधिकाऱ्यांवर थेट आरोप करून चौकशीची मागणी केल्यानंतर त्यांच्या दबाव आणण्यासाठी खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. गोळीबारची घटना नेवासा बसस्थानक परिसरात घडल्याचे फिर्यादीत नमूद असताना शहरातील एकाही नागरिकांनी ही घटना कशी पाहिली नाही, पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर घडलेल्या घटनेची पोलिसांना माहिती कशी मिळाली नाही असे प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केले.