‘राज्यसभा तो झाकी है, विधान परिषद अभी बाकी है’ असा राज्यातील महाविकास आघाडीला इशारा देताना विधान परिषदेच्या निवडणुकीत आणि त्यानंतर बरेच काही घडणार असल्याचे सुतोवाच भाजपाचे नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक यांनी कराड येथे माध्यमांशी बोलताना दिले. राज्यसभेवरील निवडीचा विजयी गुलाल घेऊन कोल्हापूरकडे रवाना होणारे खासदार महाडिक यांचा कराडच्या प्रवेशद्वारावर भाजपाचे कार्यकर्ते व हितचिंतकांनी जोरदार स्वागत व अभिनंदन केले. या वेळी माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते.

धनंजय महाडिक म्हणाले की, महाविकास आघाडीचे नेते आपल्याकडे १७४ आमदारांचे पाठबळ असल्याचा दावा करत होते. महाराष्ट्रात गेली २५ वर्षे ही निवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा आहे. पण, त्यांनी बिनविरोध निवडणुकीच्या प्रस्तावालाही नाकारले.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अपक्ष आमदार व छोट्या पक्षांवर अनेक आरोप केले आहेत. गेली अडीच वर्षे ही मंडळी त्रस्त होती आणि त्याचाच परिणाम राज्यसभेच्या मतदानात दिसून येताना महाविकास आघाडीला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले. आघाडीकडून घोडेबाजारासारखे शब्द वापरले गेल्यानेच अपक्ष व छोट्या पक्षांचा त्यांना फटका बसला, अशी टीका महाडिक यांनी केली.

देवेंद्र फडणवीस व चंद्रकांतदादा पाटील यांची रणनीती संख्याबळ अपुरे असतानाही भाजपाला तीनही जागी यश मिळाल्याने फडणवीस व चंद्रकांतदादांचे कौतुक होणे स्वाभाविक असल्याचे म्हणाले. कुणी मते दिली हे सांगायला मी काही अंतरयामी नसल्याचा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना लगावला. आपण महाराष्ट्रातील २८७ आमदारांचे आभार मानत आहोत. विशेषतः भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप व मुक्ताताई टिळक या लढवय्या आमदारांनी प्रकृती बरी नसताना देखील मतदान केल्याबद्दल आपण त्यांना पुण्यात समक्ष भेटून त्यांचे आशीर्वाद घेतल्याचंही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – ‘दुर्धर आजाराने ग्रस्त असूनही…’ धनंजय महाडिकांनी मानले लक्ष्मण जगतापांचे आभार

महाडिक परिवार म्हटलं की सर्वांनी विरोधासाठी एकत्र येण्याचे षडयंत्र पूर्वीपासून आहे. पण, आम्ही जनतेच्या पाठबळावर संघर्ष करीत आलो आहोत. आमचे कुटुंबप्रमुख महादेवराव महाडिक यांचे सात भाऊ असून, या निवडणुकीत सर्वत्र माझे दहा भाऊ झटत होते. महाडिक परिवार तीन चार जिल्ह्यात विखुरला असून, आता आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह भाजपच्या सत्तेचे मोठे पाठबळ असल्याने लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील सत्तास्थाने भाजपाकडे असतील. याचबरोबर सर्वसामान्यांच्या आशीर्वादाने महाडिक परिवाराचा दबदबा वाढेल, राजकीय सामाजिक उंची वाढण्याबरोबरच मोठी पदेही येतील असा ठाम विश्वास खासदार महाडिक यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.