लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : जिल्ह्यात पाच आमदार काँग्रेसचे असतील आणि राज्याचा मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल असे मत माजी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांनी शनिवारी रात्री मिरजेत झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.

नूतन खासदार विशाल पाटील यांचा मिरज विधानसभा मतदार संघाच्यावतीने जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. कदम बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, युवा नेते जितेश कदम, सुरेश आवटी, संजय मेंढे, माजी महापौर किशोर जामदार आदींसह मिरज शहर व पूर्व भागातील अनेक गावातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

आणखी वाचा-“देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला त्रास दिला अन् त्यांची…”; विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?

डॉ. कदम म्हणाले, लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना सर्वाधिक मत्ताधिक्य मिरजेने दिले, ही निवडणुक सोपी नव्हती. ज्या पक्षात आम्ही काम करत होते त्याचे पक्षाचे तिकिट मिळत नव्हते, त्यामुळे अन्याय होत असल्याचे पाहून जनतेनेच या निवडणुकीत साथ दिली. जनतेने काँग्रेस पक्षाला आणि पक्षाच्या विचाराला साथ दिली. काँग्रेसचे विचार वाचविण्यासाठी जनतेने ही निवडणुक हातात घेतली. मिरज विधानसेभेसाठी कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसचा झेंडा फडकला पाहिजे.

खासदार पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षाचा विचार, वसंतदादांचे विचार धोक्यात होते परंतु मिरज मतदार संघाने भरघोस मतदान केले. मिरजकरांनी दाखवून दिले की आम्ही स्वाभिमानी आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये मिरजेत काँग्रेसचाच उमेदवार विजयी झाला पाहिजे. जातीयवादी पक्षाचा पराभव करू शकतो, बलाढ्य पक्षाचा पराभव करू शकतो असा विश्वास आला आहे. जिल्ह्यातून चार ते पाच काँग्रेसचे आमदार निवडून आले पाहिजेत. यावेळी आमदार सावंत, माजी राज्यमंत्री घोरपडे यांचीही भाषणे झाली.