दापोली : राज्याचे परिवहनमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या मुरूडमधील तथाकथित साई रिसॉर्टच्या कागदपत्रांची ग्रामपंचायतीतून जमवाजमव करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी शुक्रवारीदेखील दापोली मुक्कामी होते. या रिसॉर्टच्या जागेची मोजणी आणि मूल्यांकन केल्यानंतर त्याबाबतची योग्य कागदपत्रे शोधण्याचा निर्णय ईडीच्या अधिकाऱ्यांनी घेतला होता. मुळात अनिल परब यांनी हे रिसॉर्ट उद्योजक सदानंद कदम यांचे असल्याचा दावा केला आहे. आता या रिसॉर्टबाबत मुरूड ग्रामपंचायतीला सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांवर कोणाचे नाव आणि कोणता दिवस नमूद आहे, याची शहानिशा करण्यासाठी संबंधित सर्व कागदपत्रे या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहेत. गुरुवारी छाप्याच्या पहिल्या दिवशी पूर्ण वेळ रिसॉर्टचीच झाडाझडती करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायतीतील कागदपत्रे ताब्यात घेण्यासाठी या पथकाने पुन्हा सकाळी मुरूडला भेट दिली. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांची अक्षरश: धावपळ झाली. पथकाने रीतसर अर्ज केल्यानंतर ग्रामपंचायतीने सर्व कागदपत्रे त्यांना उपलब्ध करून दिली. त्यानंतर या रिसॉर्टशी संबंधित दापोलीतील शासकीय विभागातील कागदपत्रेही त्यांनी ताब्यात घेतल्याचे समजते. संध्याकाळी त्यांनी दापोलीतून परतीचा प्रवास सुरू केला. सलग दोन दिवस ही चौकशी होत असल्याने या सर्व प्रकरणात अनिल परब व सदानंद कदम हे अडचणीत येणार असल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात सध्या सुरू आहे.