Eknath Shinde London Announcement about Marathi Sahitya Sammelan: जगभरात विखुरलेल्या मराठी बांधवांना, उद्योजकांना आणि मराठी संस्कृतीला एका वैश्विक व्यासपीठावर आणण्यासाठी पुढील ‘विश्व मराठी साहित्य संमेलन’ लंडनमध्ये आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. लंडन येथील ऐतिहासिक अशा महाराष्ट्र मंडळाने त्यांचा ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार देऊन सन्मान केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. सातासमुद्रापलीकडे मराठी माणसाने झेंडा फडकवला आहे, त्यामुळे महाराष्ट्र मंडळाच्या पाठीशी सरकार आणि एकनाथ शिंदे म्हणून मी खंबीरपणे उभा आहे, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

मराठी भाषकांसाठी मध्यवर्ती संस्था

आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला, तरी तो आपली माती, भाषा आणि संस्कृती कधीही विसरत नाही. नुकताच मराठी भाषेला केंद्र सरकारकडून ‘अभिजात भाषेचा’ दर्जा मिळाला आहे. मराठी भाषेचा हा डंका जगभरात गाजवण्यासाठी आणि जागतिक स्तरावर मराठी माणसांना मजबुतपणे जोडण्यासाठी लंडनमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन भरवले जाईल तसेच जगभरातील मराठी भाषकांसाठी एक मध्यवर्ती संस्था स्थापन करण्याबाबतही विचार करीत असल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्र मंडळाने पुढेही लंडनमध्ये मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरेचे जतन करण्याचे काम सुरू ठेवावे. तुमच्या पाठीशी सरकार आहे आणि एकनाथ शिंदेही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

लंडनशी महाराष्ट्राचे संबंध जुने

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा लंडनशी सबंध येऊन गेला आहे असे सांगून उपमुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांच्या लंडनमधील वास्तव्याच्या ठिकाणाचे स्मारक महाराष्ट्र सरकारने विकसित केल्याचे सांगितले. लंडनमध्ये ज्या वास्तूत बाबासाहेबांचे वास्तव्य होते, तेथे नतमस्तक होण्याचे भाग्य मला लाभले. बाबासाहेबांनी लिहिलेल्या अद्वितीय संविधानामुळेच आज माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता राज्याच्या सर्वोच्च पदावर सेवा करू शकत आहे, अशा भावना त्यांनी या वेळी व्यक्त केल्या.