Nida Khan arrested in Nashik TCS conversion case following a massive undercover police operation in Chhatrapati Sambhajinagar : नाशिकच्या टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण आणि धार्मिक भावना दुखावण्याच्या प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून निदा खान फरार होती. पोलिसांकडून तिचा सर्वत्र शोध घेतला जात होता. अखेर ही शोध मोहीम संपुष्टात आली असून निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या निदा खानला अटक करण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेची इनसाईड स्टोरी आत्ता समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निदा खान ज्या परिसरात लपून बसली असल्याचा पोलिसांना संशय होता, त्या भागात पोलीस जेव्हा पोहोचले, त्यावेळी पोलिसांनी त्यांचा खाकी गणवेश आणि गाड्या दूर ठेवल्या होत्या . अत्यंत काळजीपूर्वक आणि सुनियोजित पद्धतीने राबवलेल्या मोहिमेनंतर पोलिसांनी निदा खानला बेड्या ठोकल्या. सक्तीच्या धर्मांतराचे प्रकरण उघडकीस आल्यापासून निदा खान फरार होती. तेव्हापासून पोलीस तिचा सातत्याने शोध घेत होते.

नेमकं काय झालं?

पोलिसांकडून अथकपणे निदा खानचा शोध घेतला जात असतानाच ती छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरातील कैसर कॉलनीत, एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये लपून बसली असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. गेल्या तीन ते चार दिवसांपासून ती याच ठिकाणी राहत असल्याची माहिती मिळाली होती. विशेष म्हणजे ती येथे एकटी नव्हती. तिचे वडील, आई, भाऊ आणि मावशी देखील तिच्याबरोबर होते. पण पोलिसांना याबाबत पूर्ण खात्री करून घ्यायची होती. निदा खान नारेगाव भागातच असल्याची पुष्टी करण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि लोकेशन ट्रॅकिंगचा वापर केला.

त्यानंतर पोलिसांच्या एका दुर्मिळ डावपेचाचा वापर करण्यात आळा. ज्या क्षणाची आपण वाट पाहत आहोत, तो क्षण जवळ आल्याचे माहिती असूनही पोलिसांनी कमालीचा संयम राखला. अटकेची कारवाई करण्याच्या आधी पोलिसांनी त्या परिसरात सलग तीन ते चार दिवस पाळत ठेवली.

या कालावधीत लोकांच्या नजरेत येऊ नये म्हणून पोलिसांनी सामान्य लोकांच्या गर्दीत मिसळून काम करण्याचा निर्णय घेतला. निदा खान राहत होती त्या भागात आणि त्याच्या जवळपासच्या परिसरात २० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. विशेष म्हणजे, हे पोलीस त्यांच्या गणवेशात नव्हते तर साध्या वेशात वावरत होते. तसेच पोलिसांच्या गाड्यांचा वापर देखील यावेळी टाळण्यात आला, जेणेकरून स्थानिकांना पोलिसांच्या मोहिमेचा सुगावा लागू नये.

मिळालेल्या माहितीनुसार, निदा खान ही छत्रपती संभाजीनगर येथील काही वकिलांकडून कायदेशीर सल्ला घेत होती. तसेच उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्याची तयारीही सुरू होती. मात्र, जामीन अर्ज दाखल करण्यापूर्वीच पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.

अटकेनंतर काल रात्री उशिरा निदा खानला सूतगिरणी चौक येथील न्यायिक अधिकाऱ्यांच्या अधिकृत निवासस्थानी न्यायाधिशांसमोर हजर करण्यात आले. नाशिक पोलिसांनी तिचा ट्रान्झिट रिमांड मिळवला आणि पुढील तपासासाठी विशेष वाहनाने तिला घेऊन ते नाशिककडे रवाना झाले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निदा खानला अटक करण्यात आले तेव्हा तिच्याबरोबर इतर पाच लोक हजर होते.

तिने गेल्या महिन्यात आपण गरोदर असल्याचा दावा करत अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळावे अशी मागणी तिने केली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळून लावली. या प्रकरणात अटक करण्यात आलेली खान ही आठवी आरोपी आहे. इतर सात जणांना तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच अटक करण्यात आली होती.