संजय वाघमारे

तरुणानेच पत्नीला जाळल्याचा सहा वर्षांच्या भावाचा जबाब

तालुक्यातील निघोज येथे घडलेल्या ‘ऑनर किलिंग’ प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली असून या प्रकरणात जखमी झालेल्या मंगेश रणसिंग यानेच पत्नी रुक्मिणीला पेट्रोल ओतून पेटवून दिले असल्याचा जबाब रुक्मिणीचा सहा वर्षांचा भाऊ निन्चू याने दिला आहे.

घटना घडल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील, उप अधीक्षक मनीष कलवानीया, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी घटनास्थळाला भेट देऊ न संबंधित घराचा दरवाजा तोडणाऱ्या व्यक्तींकडे, रुक्मिणीच्या लहान भावंडांकडे कसून चौकशी केली. या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या असून पोलीस अधिकारीही हा ‘ऑनर किलिंग’चा प्रकार नसून  मंगेशनेच रुक्मिणीला पेटवले असावे, या निष्कर्षांप्रत आले आहेत. या घटनेचा सखोल तपास करून सत्य घटना पुढे आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार  सहा महिन्यांपूर्वी मंगेश आणि रुक्मिणीने आंतरजातीय प्रेमविवाह केला. या विवाहाला दोघांच्याही कुटुंबीयांचा विरोध नव्हता. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंगेशने रुक्मिणीला त्रास देण्यास सुरुवात केली. किरकोळ कारणांवरून तो तिला बेदम मारहाणही करीत असे. घटनेच्या आधी सलग तीन दिवस मंगेशने रुक्मिणीला बेदम मारहाण केली होती. मारहाणीला कंटाळून रुक्मिणी गावातीलच आपल्या माहेरी निघून आली.

रुक्मिणी माहेरी आली असली, तरी मंगेश कधीही येऊ न आपल्या मुलीला मारहाण करील या भीतीने रुक्मिणीची आई मोलमजुरीला जाताना रुक्मिणी आणि तिच्या लहान भावंडांना घरात ठेवून दाराला बाहेरून कुलूप लावून जात असे. घटना घडली त्या दिवशीही घरात रुक्मिणीसह तिची लहान भावंडे, निन्चू (वय ६), करिष्मा (५), विवेक (३) घरातच होते. आई घराला बाहेरून कुलूप लावून मोलमजुरीसाठी निघून गेली. वडीलही सकाळीच मजुरीसाठी बाहेर पडले होते. त्या दिवशी नेमके काय घडले हे सहा वर्षांचा निन्चू सविस्तर सांगतो.

रुक्मिणी राहत असलेले घर जुन्या बांधणीचे, लाकडी खांडांचे आहे. घराच्या माळवदाचे एक खांड पडलेले आहे. १ मे रोजी मंगेशने घराच्या मागच्या बाजूने, पडलेल्या भागातून घरातून प्रवेश केला. मंगेशने सोबत बाटलीतून पेट्रोल आणले होते. सोबत आणलेले पेट्रोल मंगेशने रुक्मिणीच्या अंगावर ओतले आणि तिला पेटवले. रुक्मिणीने पेट घेतल्यावर तिने मंगेशला मिठी मारली. रुक्मिणीचा लहान भाऊ  निन्चूने  घटना नेमकी कशी घडली हे पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांनीही निंनचूचा जबाब नोंदवला आहे. निन्चू बरोबरच करिष्मा, विवेक ही लहान भावंडेही घटना घडली त्या वेळी घरात होती.  झालेल्या घटनेने भेदरलेली ही लहान मुले घराच्या कोपऱ्यात बसली होती.

दरम्यान आरडाओरडा आणि घरातून येणारे धुराचे लोट पाहून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजाला कुलूप असल्याने टिकावाच्या साहाय्याने दरवाजा तोडण्यात आला. गंभीर भाजलेल्या अवस्थेतील रुक्मिणी स्वत: घराबाहेर आली. पाठोपाठ मंगेशही आला. तोपर्यंत रुग्णवाहिका आली. रुग्णवाहिकेतून रुक्मिणी आणि मंगेशला सुरुवातीला नगर येथील जिल्हा रुग्णालयात आणि नंतर पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. पुणे येथे उपचारादरम्यान रुक्मिणीचा मृत्यू झाला.

पोलिसांनी मंगेशच्या फिर्यादीनुसार ‘ऑनर किलिंग’चा गुन्हा दाखल केला असला, तरी भारतीया आणि रणसिंग ही दोन्ही कुटुंबे परराज्यातून मोलमजुरीसाठी निघोज येथे आली आहेत. रोजच्या जगण्याचे प्रश्न त्यांच्या समोर आहेत. अशा परिस्थितीत प्रतिष्ठेचा विचार करण्यासाठी त्याच्याकडे वेळ होता का, या विवाहामुळे खरोखरच या दोन्ही कुटुंबांची प्रतिष्ठा पणाला लागली होती का, रुक्मिणी आणि मंगेशच्या विवाहापूर्वी आणि विवाहानंतरही मंगेशचे रुक्मिणीच्या घरी येणे-जाणे होते, मग घटना घडली त्या दिवशी असे काय घडले ज्यामुळे अचानक रुक्मिणीच्या कुटुंबाला प्रतिष्ठेची आठवण झाली, असे अनेक प्रश्न स्थानिकांमधे चर्चिले जात आहेत. त्यामुळे ‘ऑनर किलिंग’बरोबरच पोलीस इतर शक्यताही पडताळून पाहत आहेत.

गुन्हेगारी प्रवृत्तीचा संशय..

मंगेश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता आणि तो रुक्मिणीला बेदम मारहाण करीत असे, असाही दावा केला जात आहे. त्याने रुक्मिणीला पेटवल्यानंतर तिने त्याला मिठी मारल्याने तोही जवळपास ४० टक्के भाजला असे चौकशीतून स्पष्ट झाले आहे.

जबाबाचे गूढ..

रुक्मिणीने मृत्युपूर्व जबाबात मंगेश आणि मला माझे वडील, मामा आणि काकांनी पेटवून दिल्याचे सांगितले आहे. ससून रुग्णालयात मंगेशच्या बहिणीने रुक्मिणीच्या आईसह इतर नातेवाईकांना रुक्मिणीला भेटू दिले नाही, ही बाबही पुढे आली आहे. त्यामुळे रुक्मिणीने दबावातून जबाब दिला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मृत्यूशय्येवर असलेल्या आणि समोर मृत्यू दिसत असलेल्या रुक्मिणीने पोलिसांसमक्ष खोटा जबाब द्यावा, इतके मोठे दडपण तिच्यावर कोणी आणि कसे आणले, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.