अहिल्यानगर:शहरातील सरकारी कार्यालये जिल्ह्याच्या कोपऱ्यातील दूरवरच्या लोणीसारख्या ग्रामीण भागात पळवली जात आहेत. यातून अहिल्यानगर शहर विकासाच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण होत आहे. या विरोधात आपण मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असून हे प्रकार न थांबल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा खासदार नीलेश लंके यांनी पत्रकार परिषदेत दिला. पालकमंत्री अधिकाराचा गैरवापर करत असे प्रकार करत असल्याचा आरोपही लंके यांनी केला.

लंके यांनी यासंदर्भात जलसंपदा व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयाचे उदाहरण दिले. राष्ट्रीय महामार्गचे कार्यालय स्थलांतराविरोधात आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन लक्ष वेधले. त्यांनी स्थलांतर थांबवण्याचा आदेश दिला, असेही लंके यांनी सांगितले. मंजूर झालेले सरकारी वैद्यकीय महाविद्यालय लोणीला पळवले जाणार होते, मात्र आपण विरोध केल्याने ते शहराजवळ स्थापन केले जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

असेच प्रकार सुरू राहिले तर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदही लोणी, शिर्डीकडे पळवले जाईल. यापूर्वी विमानतळासाठी शहराजवळील पिंपळगाव माळवीची जागा निश्चित केली होती. परंतु तेही शिर्डीला पळवले गेले. आताही संरक्षण विभागाचा कारखाना शहराजवळ, राहुरी किंवा ढवळपुरी भागात सरकारी जागा उपलब्ध असूनही शिर्डीकडे नेण्यात आला. एक एक कार्यालये असेच शिर्डी, लोणीकडे जायला लागले तर सर्वच पक्षांनी या विरोधात एकत्र यायला हवे, असेही आवाहन खासदार लंके यांनी केले.

सरकार आर्थिक अडचणीत आहे, ठेकेदारांचे कामांचे पैसे मिळत नाहीत, असे असताना शहरातील कार्यालय ओस पाडून लोणीमध्ये नवीन कार्यालयासाठी पैसा कुठून आणणार, कर्मचाऱ्यांचीही गैरसोय होणार, शहरातील ओस पडलेल्या जागा बळकावण्याचा हा प्रयत्न नाहीना, अशीही शंका लंके यांनी उपस्थित केली.

पालकमंत्री जिल्ह्याचे की एका गावाचे?

पालकमंत्री हे जिल्ह्याचे असतात केवळ एका गावाचे नसतात. एकाधिकारशाहीने सर्व काही आपल्या गावाकडेच हवे असा अट्टाहास केला जात आहे. यामुळे जिल्ह्याची राजधानी असलेल्या नगर शहराचा विकास होत नाही. केवळ आपले संस्थान विकसित केले जात आहे. पंतप्रधान, संरक्षणमंत्री, गृहमंत्री यांनाही केवळ आपल्याच गावाकडे नेले जाते. जिल्ह्यात इतर ठिकाणे नाहीत का? असे खासदार लंके म्हणाले.

मनमाड रस्त्याचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न

अहिल्यानगर-मनमाड रस्ता त्यांच्या (सुजय विखे) खासदारकीच्या काळात पूर्ण झाला नाही. तो आपल्याच कार्यकाळात पूर्ण होणार आहे. परंतु त्याचेही खोटे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण उपोषण केल्यानंतरच या रस्त्याचे काम सुरू झाले, असाही आरोप लंके यांनी केला.