अहिल्यानगर : राज्यात घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांबाबत विद्यार्थी, पालक व शिक्षकांकडून व्यक्त होत असलेल्या नाराजीकडे लक्ष वेधत खासदार नीलेश लंके यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांना (पुणे) पत्र पाठवून प्रश्नपत्रिकांच्या काठिण्य पातळी व स्वरूपाबाबत सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
खासदार लंके यांनी पत्रात म्हटले की, शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक गुणवत्ता, संकल्पनात्मक आकलन व तार्किक विचारशक्तीचे मूल्यमापन करणारी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. विशेषतः ग्रामीण व सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आर्थिक सहाय्याबरोबरच त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला दिशा देणारी ठरते. मात्र, यावर्षी भाषा व गणित विषयांच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या वयोगट, मानसिक विकास पातळी आणि निर्धारित अभ्यासक्रमाच्या तुलनेत अधिक कठीण असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात पुढे आल्या आहेत. काही प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील असल्याचेही निदर्शनास आले आहे.
त्यामुळे परीक्षेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे न्याय्य मूल्यमापन करण्याऐवजी मानसिक ताण निर्माण करणारी ठरत असल्याची भावना शिक्षक व पालक यांच्याकडून व्यक्त होत आहे. लहान वयातील विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापन प्रक्रिया प्रेरणादायी व आत्मविश्वास वाढवणारी असावी, प्रश्नपत्रिका संतुलित, अभ्यासक्रमाधारित व आकलनक्षमतेला चालना देणारी असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच प्रश्नपत्रिका तयार करताना विद्यार्थ्यांचा वयोगट, मानसिकता व शिकण्याची पातळी लक्षात घेणे, काठिण्य पातळी संतुलित ठेवून न्याय्य मूल्यमापन करणे, आकलन, विश्लेषण व समस्या सोडवण्यावर आधारित प्रश्नांचा समावेश करणे, प्रश्नपत्रिका निर्मितीत अनुभवी शिक्षक व शिक्षणतज्ज्ञांचा सहभाग निश्चित करणे, अभिप्राय संकलन व पुनरावलोकनासाठी पारदर्शक यंत्रणा विकसित करणे, शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी, न्याय्य आणि विकासाभिमुख ठरावी, या दृष्टीने परीक्षा परिषदेकडून सकारात्मक व संवेदनशील दखल घेतली जाईल, अशी अपेक्षा खासदार लंके यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान गेल्या रविवारी इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आली. इयत्ता पाचवी व आठवीसाठी झालेली ही अखेरची शिष्यवृत्ती परीक्षा होती. आता यापुढे इयत्ता ४ ती व ७ वी साठी शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. ही परिक्षा २६ एप्रिलला होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिली.

