अहिल्यानगर : सिस्पे कंपनीतील गुंतवणुकीच्या घोटाळ्याचा राजकीय स्वार्थासाठी वापर केला जात आहे. या कंपनीच्या कार्यालयाच्या केवळ उद्घाटनासाठी आपण उपस्थित होतो. या कंपनीशी आपला कोणताही संबंध नाही, या कंपनीतील गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्याऐवजी बदनामीसाठी आपल्यावर आरोप केले जात आहेत, असे स्पष्टीकरण खासदार नीलेश लंके यांनी दिले आहे. बुडालेल्या पटवर्धन पतसंस्थेतील ठेवीदारांना प्रवरा बँक का पैसे देत नाही, असाही प्रश्न लंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता केला.

सिस्पे कंपनीच्या घोटाळ्यातील आरोपींना खासदार लंके पाठीशी घालत आहेत, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. महापालिका निवडणूक प्रचारासाठी अहिल्यानगरमध्ये आलेल्या मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी प्रचारसभेत चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचा आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. या संदर्भात लक्ष वेधले असता पत्रकारांशी बोलताना लंके यांनी वरील स्पष्टीकरण दिले.

खासदार लंके म्हणाले, सिस्पे गुंतवणूकदारांना पैसे परत मिळवून देण्यासाठी कोणतेही प्रयत्न ‘त्यांनी’ केले नाहीत. उलट मीच खासदार शरद पवार, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली, शरद पवार यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून सिस्पे घोटाळ्यातील आरोपींच्या अटकेची मागणी केली. या कंपनीच्या कार्यालयाच्या केवळ उद्घाटनासाठी मी उपस्थित होतो. निमंत्रण पत्रिकेवर अनेक आमदार, खासदार, पोलीस अधिकाऱ्यांची नावे होती. मी उद्घाटनाला उपस्थित होतो याचा अर्थ मी त्यामध्ये अडकलो आहे, असे नाही. आपण राजकीय क्षेत्रात असल्याने कधीकाळी भेटलेल्या लोकांबरोबरचे छायाचित्रे प्रसिद्ध करून आरोप केले जात आहेत.

एवढीच जर त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे तर शेतकऱ्यांच्या नावावर प्रवरा कारखान्याने घेतलेले कर्ज स्वतःच्या खिशात का घातले? त्याचा गुन्हाही दाखल आहे.

भाजपने महापालिका निवडणुकीत विरोधी उमेदवाराला धमकावून अर्ज मागे घेण्यास लावले व ५ बिनविरोध निवडून आणले, आताही आमदाराचा अंगरक्षक रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावत असल्याने त्याला निलंबित करण्यात आले.

महापालिकेतील भ्रष्टाचारावर मुख्यमंत्र्यांचे मौन – लंके

शहरात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी किमान महापालिकेतील घोटाळ्यावर बोलायला हवे होते, आमच्या हाती सत्ता आली तर महापालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढू, यासाठी किमान एकदा तरी महाविकास आघाडीला संधी द्यायला हवी. महापालिकेत मनमानी पद्धतीने कारभार चालतो, महापालिकेतील भ्रष्टाचारावर बोलण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. निवडणूक वेगळ्या वाटेवर नेली जात आहे, असाही आरोप लंके यांनी केला.