अहिल्यानगर : महावितरणने जिल्ह्यात सायंकाळी ६ ते १० दरम्यान सुरू केलेल्या वीज कपातीच्या विरोधात खासदार नीलेश लंके यांनी आज, शुक्रवारी शहरातील महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले. दोन दिवसात वीज कपात बंद झाल्यास कार्यालय बंद पाडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ, प्रा. सिताराम काकडे, रामेश्वर निमसे, श्रीकांत जगदाळे, अमोल खाडे, एकनाथ गांगर्डे, भाऊसाहेब काळे, पोपट पुंड, उद्योजक अल्ताफ शेख तसेच शेतकरी सहभागी होते.
यावेळी बोलताना खासदार लंके म्हणाले, वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत, त्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. महिलांच्या स्वयंपाकाच्या वेळेत वीज नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. ग्रामीण भागात बिबट्याच्या भीतीमुळे अंधारात राहणे धोकादायक ठरत आहे. या प्रश्नावर अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाली. दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. आरडीसी योजना पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर २४ तास वीजपुरवठा शक्य होणार आहे.
दरम्यान, अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे यांनी सांगितले की, वीजचोरी हा गंभीर प्रश्न असून तो नियंत्रणात आल्यानंतर २४ तास वीजपुरवठा देणे शक्य होईल. शक्य तितक्या प्रमाणात वीस पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. यावेळी अधीक्षक अभियंता रमेशकुमार पवार उपस्थित होते.
दिल्लीगेट व माळीवाडा वेस पाडण्यास विरोध
अहिल्यानगर शहराला दिल्लीगेट व माळीवाडा वेशीची पारंपारिक ओळख आहे. जाणीवपूर्वक राजकारण करून माळीवाडा वेस पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप खासदार लंके यांनी माध्यमांशी बोलताना केला. काही समाजकंटक यामागे असल्याचे सांगत त्यांनी वेस पाडण्यास विरोध दर्शवला. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवरच आपण राजकारण करत असून म. ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे पुतळे उभारले जावेत, अशी मागणी त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करा
जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आपण पाहणी करून प्रशासनाला पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे खासदार लंके यांनी सांगितले.
