सावंतवाडी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवनेरी येथील जन्मोत्सवापासून खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली ‘आपला मावळा’ संघटनेच्या वतीने सुरू करण्यात आलेले ‘गड-किल्ले स्वच्छता मोहीम अभियान’ रविवारी सिंधुदुर्ग मालवणमध्ये दाखल झाले. यावेळी शेकडो शिवप्रेमी आणि कार्यकर्त्यांनी ‘जय भवानी-जय शिवाजी’ अशा आवेशपूर्ण घोषणा देत किल्ले सिंधुदुर्गवर स्वच्छता मोहीम राबवली.

​मोहिमेच्या प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी खासदार लंके यांचे स्वागत केले. या मोहिमेअंतर्गत खासदार लंके यांनी लोकवर्गणीतून उपलब्ध झालेल्या निधीतून किल्ला परिसरात आवश्यक असणारे बेंच, कचरा कुंड्या आणि सूचना फलक उपलब्ध करून दिले आहेत. किल्ले सिंधुदुर्ग तसेच बंदर जेटी येथे पर्यटकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली असून, किल्ल्यावरील विविध स्मृती स्थळे व मंदिरांचे नामफलक खासदार लंके यांच्या हस्ते लावण्यात आले.

​महाराजांची सागरी राजधानी असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचा परिसर स्वच्छ आणि सुशोभित करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनीही खासदार लंके यांचे स्वागत केले.

​या मोहिमेत मालवण तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, कुडाळ तालुकाध्यक्ष शिवाजी घोगळे, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष रविकिरण गवस, जिल्हा सचिव रुपेश जाधव, उत्तम सराफदार, नजीरभाई शेख, नयन गावडे, समीर आचरेकर, अगोस्तीन डिसोजा, माजी नगराध्यक्षा नम्रता कुबल, महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, बबलू गावडे यांच्यासह ‘आपला मावळा’ संघटनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.