अहिल्यानगर: अहमदनगर लोकसभा मतदारसंघाततून विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार नीलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी भाजपचे पराभूत उमेदवार डॉ सुजय विखे यांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली आहे. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायमूर्ती किशोर संत यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून हा निकाल दिला. खासदार लंके यांच्या वतीने वकील प्रमोद पाटील यांनी बाजू मांडली तर माजी खासदार विखे यांच्या वतीने एस. व्ही. कानिटकर व ए. व्ही. होन यांनी बाजू मांडली.
अहमदनगर लोकसभा निवडणुकीत नीलेश लंके यांनी ६ लाख २४ हजार ७९७ मते मिळवीत भाजपचे उमेदवार विखे यांचा २८ हजार ९२९ मतांनी पराभव केला. त्यानंतर १८ जुलै २०२४ रोजी सुजय विखे यांनी नीलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. प्रचारादरम्यान खोटे व बदनामीकारक वक्तव्य केली गेली, खर्च मर्यादा ९५ लाख असताना ती ओलांडली गेली व त्याचा योग्य हिशोब सादर केला गेला नाही. बनावट मतदान झाले. मतदान यंत्र तपासणीसाठी अर्ज नाकारला गेला. त्यामुळे निवडणुकीचा निकाल रद्द करावा अशी मागणी याचिकेद्वारे विखे यांनी केली होती.
या प्रकरणात समन्स मिळाल्यानंतर खासदार लंके यांनी २१ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज सादर करत निवडणूक याचिका कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य नसल्याने ते फेटाळून लावावी अशी मागणी केली होती. न्यायालयाच्या निकालानंतर प्रतिक्रिया देताना खासदार लंके म्हणाले, हा विजय माझा नाही तर सत्याचा, न्यायाचा व जनतेच्या अटळ विश्वासाचा विजय आहे. लोकसभेच्या निकालानंतर काहींनी जनतेच्या कौलाचा अपमान करत न्यायालयात धाव घेतली. खोटे आरोप, दबाव व निकाल बदलण्याचे प्रयत्न झाले. मात्र सत्य कधीच हरत नाही, हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे.
न्यायालयाने स्पष्ट संदेश दिला की जनतेचा निर्णय हा सर्वोच्च असतो. मी न्यायव्यवस्थेचा मनापासून आभारी आहे. हा आनंद वैयक्तिक नसून जिल्ह्याच्या जनतेच्या प्रेमाचा व विश्वासाचा सन्मान आहे. आम्ही कोणत्याही दबावाला झुकणार नाही. आमचा स्वाभिमान कायम ठेवत जनतेची सेवा करत राहू. निवडणूक निकालानंतर सुजय विखे यांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज दाखल करत त्याचे शुल्कही जमा केले होते. मात्र नंतर हा अर्ज मागे घेतला.
