"शरद पवारांनी पोलिसांकडून मार खाल्लेला पुरावा..." महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून निलेश राणेंचा खोचक टोला | nilesh rane on sharad pawar statement beating by police maharashtra karnataka border dispute rmm 97 | Loksatta

“शरद पवारांनी पोलिसांकडून मार खाल्लेला पुरावा…”, महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून निलेश राणेंचा खोचक टोला

शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावर निलेश राणे यांनी खोचक टोला लगावला आहे.

“शरद पवारांनी पोलिसांकडून मार खाल्लेला पुरावा…”, महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून निलेश राणेंचा खोचक टोला
संग्रहित फोटो-लोकसत्ता

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकामधील सीमावाद पेटला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील ४० गावांवर दावा सांगितल्यानंतर या वादाला तोंड फुटलं. या संघर्षाची धग आता बेळगावात महाराष्ट्रातील वाहनं फोडण्यापर्यंत पोहोचली आहे. याचे पडसाद आता पुण्यात उमटले असून येथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या गाड्यांना काळं फासलं आहे.

या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच त्यांनी कर्नाटक सरकारला इशाराही दिला आहे. “महाराष्ट्र-कर्नाटक सीमेच्या बाबतीत जे झालं, ते अत्यंत निषेधार्ह आहे. गेल्या काही आठवड्यांपासून हे प्रकरण सुरू आहे. सीमा भागाशी मी अनेक वर्षे संबंधित आहे. मला स्वत:ला लाठीहल्ल्याला तोंड द्यावे लागले,” असं शरद पवार यांनी सांगितलं. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा- महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक झाल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना इशारा, म्हणाले “जर उद्या…”

शरद पवारांच्या या विधानानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते निलेश राणे यांनी खोचक टोला लगावला आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटलं की, “शरद पवारांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रकरणात १९८६ ला पोलिसांकडून मार खाल्ला, याचा पुरावा कोणीतरी मला पाठवा. मला पुरावा सापडत नाही” असा टोला निलेश राणे यांनी लावला आहे.

शरद पवार पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

“दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन ही परिस्थिती निवळावी, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पुढील २४ तासात परिस्थिती निवळली पाहिजे. अन्यथा कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यासाठी जबाबदार असतील. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून चिथावणीखोर भूमिका घेतली जात असेल, तर हा देशाच्या स्थैर्याला मोठा धक्का आहे. केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. उद्यापासून संसदीय अधिवेशन सुरू होत आहे. राज्यातील खासदारांना सांगणार आहे, की संसदेत भूमिका मांडा. कोणी कायदा हातात घेतला, तर त्याची जबाबदारी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारला घ्यावी लागेल,” असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 18:52 IST
Next Story
“स्वत:साठी दुसऱ्या राज्यात पळून गेले, पण महाराष्ट्रासाठी…”, सीमाप्रश्नावरून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल