महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियानाचे ( उमेद ) देवगड व्यवस्थापक शिवाजी पांडुरंग खरात यांना भाजपाचे आमदार नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी मारहाण केली आहे. या प्रकरणावरुन मारहाण झालेल्या खरात यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर आता नितेश राणेंनी आपली बाजू मांडताना नेमकं काय घडलं याची माहिती दिली आहे. तसेच नितेश राणेंनी थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत या विषयावरुन आपण राजकारण खपवून घेणार नसून महिलेला न्याय मिळवून देणार असं म्हटलं आहे.

नितेश राणेंनी ट्विटरवरुन चार ट्विटच्या माध्यमातून या प्रकरणावर भाष्य केलं आहे. “सिंधुदुर्गमधील देवगड येथे केंद्र सरकारसाठी कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने त्यांच्या कार्यालयातील एका दिव्यांग महिलेला मारहाण करुन तिला शिवीगाळही केला. या महिलेने या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला. त्यानंतर या आरोपीने उद्धव ठाकरेंच्या सेनेतील स्थानिक नेत्याच्या मदतीने पत्रकार परिषद घेतली. प्रसारमाध्यमांना विनंती करु इच्छितो की त्यांनी पीडितेबद्दल संवेदनशीलता दाखवावी. त्याने पत्रकार परिषदेत त्या महिलेचं नावं घेतलं आणि तिची माहिती दिली. हे खरं तर कायद्याच्या विरुद्ध असून आपण कोणीही त्या महिलेच्या आत्मसन्मानाशी खेळता कामा नये,” असं नितेश राणे म्हणाले.

“या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. मला विश्वास आहे की काही दिवसांमध्ये आरोपीला योग्य शिक्षा मिळेल. प्रसारमाध्यमांमधील सर्व खोट्या बातम्यांमागील सत्य समोर येईल. येथील स्थानिक आमदार म्हणून या मतदारसंघातील सर्व महिलांच्या सुरक्षेची मी काळजी घेईन. या आरोपीने त्याला मारहाण केल्याचा आरोप केला. मात्र आरोपीला पत्रकार परिषद घेत असल्याचं पाहून आश्चर्य वाटलं. यामुळे त्या महिलेवर दबाव टाकून तिला अधिक मानसिक त्रास होईल. महिलेच्या स्वाभिमानापेक्षा राजकारण महत्त्वाचं नाही. आम्ही तिच्यासोबत आहोत आणि तिला न्याय मिळवून देणार,” असंही नितेश राणे म्हणाले.

यापूर्वी खरात यांनी काय म्हटलं होतं?
कणकवली येथे या प्रकरणासंदर्भात पत्रकारांना माहिती देताना खरात यांनी मंगळवारी थेट नितेश राणेंचा उल्लेख केला होता. “पंचायत समिती देवगड अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियान ( उमेद ) आणि कृषी विभाग आत्मा, पंचायत समिती देवगड व नगरपंचायत देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड तालुक्यातील जामसंडे येथे गोगटे हॉलमध्ये गेल्या रविवारी (१४ ऑगस्ट) रानभाजी खाद्य व विक्री महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . मी कार्यरत असलेल्या उमेद अभियान देवगड कार्यालयात किंजवडे प्रभाग समन्वयक या पदावर कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्याने या कार्यक्रमात आमदार राणे यांच्याकडे माझी खोटी तक्रार केली. यानंतर या कार्यक्रमाच्या व्यासपीठाच्या मागे नेऊन आमदार राणे यांनी मला शिवीगाळ करायला सुरवात केली. तुला संपवतो अशी धमकी देऊन स्वतः मारहाण करत ” घ्या रे याला ” असा इशारा आपल्या कार्यकर्त्यांना दिला. त्यानंतर त्यांचे सुरक्षा रक्षक आणि कार्यकत्यांनी मला हाताच्या ठोशाने तोंडावर, डोक्यावर, छातीवर, पाठीवर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली,” असं खरात यांनी म्हटलं होतं.

पोलिसांनी तक्रार घेतली नाही
“या घटनेनंतर मी देवगड पोलिस स्टेशनमध्ये त्याच दिवशी आमदार राणे व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात दोन वेळा जाऊन फिर्याद नोंदवून घेण्याची विनंती केली. मात्र ती घेतली गेली नाही,” अशी तक्रार करून खरात म्हणाले की, “यानंतर मी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालो.” “देवगड पोलिसांनी तेथे १५ ऑगस्ट रोजी पहाटे २ वाजल्याचा सुमारास जबाब नोंदवला, मात्र हा जबाब नोंदवताना आमदार राणे यांचे नाव न घेण्याचा दबाव पोलिसांनी माझ्यावर टाकला. तसेच जबाबाची प्रत मला दिली नाही किंवा तो मला वाचूनही दाखवलेला नाही. मात्र मी जबाब वाचला असल्याचे माझ्याकडून लिहून घेऊन माझी स्वाक्षरीही घेतलेली आहे,” असंही खरात म्हणाले.

माझ्या जिवीतालाही धोका
सध्या मी आणि माझे कुटुंबीय तणावाखाली आहोत. माझ्या घरी काही लोक येऊन धमकावत आहेत आणि माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे माझ्या जिवीतालाही धोका निर्माण झाला आहे. तरी आपण या विषयाला वाचा फोडावी, अशी मागणी पोलीस अधीक्षक यांच्याकडे करणार असल्याचेही खरात यांनी नमूद केले.