scorecardresearch

“काँग्रेसचेच कशाला, शिवसेनेचेही येतील”; सत्ता स्थापनेसंदर्भात निलेश राणेंचं सूचक वक्तव्य

“ते वाटोळं करतील असं वाटत असेल आणि आम्ही चांगलं काम करणार असं वाटतं असेल तर सत्ता स्थापन होईल आमची”

nilesh rane
पत्रकारांच्या एका प्रश्नावर उत्तर देत असताना साधला निशाणा

कुडाळ असो किंवा देवगड असो शक्यतो इथे आमचाच नगराध्यक्ष बसेल असं माजी खासदार आणि भाजपाचे नेते निलेश राणे यांनी म्हटलं आहे. कटकारस्थान, सत्तेचा वापर चुकीच्या पद्धतीने जे करता त्याला जनतेने नाकारलं, असंही यावेळेस निलेश राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधताना म्हटलंय.
“सिंधुदुर्ग जिल्ह्यात चारही नगरपंचायतींचे निकाल लागले आहेत यात दोन नगरपंचायतींमध्ये आमची सत्ता येणार हे सिद्ध झाले असून दोन नगरपंचायतींमध्ये जरी त्रिशंकू अवस्था असली परी देवगड आणि कुडाळ याठिकाणी आमचाच नगराध्यक्ष बसण्याची शक्यता आहे,” असं निलेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

“कुडाळ नगरपंचायतीमध्ये भाजपा एक नंबरचा पक्ष ठरला असून आमदार वैभव नाईक यांना कंटाळून नागरिकांनी आमच्या बाजूने कौल दिला आहे. सत्ता आमचीच असली असती मात्र आमची एक जागा एका मताने गेल्याने आम्ही आठ जागांवर विजयी झालो. तर शिवसेना सात जागांवर विजयी झाली आहे. काँग्रेस दोन जागांवर विजय झाली आहे. मी या सर्वांचे अभिनंदन करतो,” असंही निलेश राणे यांनी यावेळी म्हटलं आहे.

“आम्ही सर्वात मोठा पक्ष असल्याने सर्वात आधी सत्ता स्थापनेची संधी आम्हाला मिळणार. समोरुन कोणी आलं तर आम्ही कशाला नाय म्हणू?”, असा प्रतिप्रश्न निलेश राणेंनी आकड्यांची जुळवाजुळव करण्यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना विचारला. तसेच निवडणून आलेल्यांपैकी काँग्रेसचं कोणी तुमच्यासोबत आलं तर असं विचारलं असता, “काँग्रेसचेच कशाला, शिवसेनेचेही येतील. मोठा पक्ष म्हणून आम्हाला आधी सत्ता स्थापनेचा अधिकार आहे. कोणी बिचारे समोरुन आले तर आम्ही त्यांना का नाय म्हणू? इथे आमदाराच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह आहे. त्यांना आमदारच नकोय. त्यांना आमदाराच्या अंतर्गत कामच करायचं नाही. ते या शहराचं वाटोळं करतील असं वाटत असेल आणि आम्ही चांगलं काम करणार असं वाटतं असेल तर सत्ता स्थापन होईल आमची,” असं निलेश राणेंनी शिवसेनेच्या स्थानिक आमदारांवर निशाणा साधताना म्हटलं.

“कटकारस्थान, सत्तेचा वापर चुकीच्या पद्धतीने जे करता त्याला जनतेने नाकारलं. सत्ता असून, राज्यामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री असून सुद्धा त्यांना कुडाळ शहरावर शिवसेनेचा झेंडा एकहाती फडकवता आला नाही. त्यांना उमेदवारही मिळाले नाहीत उभे करायला. त्यांनी १७ जागा लढवल्या नव्हत्या. मात्र जे जे निवडून आलेत त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो,” असं निलेश राणेंनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे, “आपण कुडाळ शहरासाठी चांगलं योगदान द्यावं. कुडाळ चांगलं दर्जेदार शहर असावं, दिसावं यासाठी आपलं योगदान राहील असा सर्वांना प्रयत्न करावा,” असं निलेश राणेंनी निवडून आलेल्यांना शुभेच्छा देताना म्हटलंय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nilesh rane says we will form government in kudal and devgad nagar panchayat scsg