शनिवारपासून पुन्हा सुरू झालेल्या गारपिटीने मराठवाडय़ाला झोडपले असून त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला. विविध ठिकाणी ५४ लहान व ६८ मोठय़ा जनावरांचा मृत्यू झाला. घरांचीही मोठय़ा प्रमाणात पडझड झाली. औरंगाबाद व जालना जिल्ह्य़ांत पडझडीचे प्रमाण अधिक आहे. सोमवारी पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. परिणामी झाडे उन्मळून पडली. गारपिटीमुळे भाजीपाल्यासह टरबूज, खरबुजाचे मोठे नुकसान झाले.
औरंगाबाद जिल्ह्य़ातील कन्नड, खुलताबाद व सिल्लोड तालुक्यांना गारपिटीचा सर्वाधिक तडाखा बसला. १६ गोठय़ांची पडझड झाली. औरंगाबाद, लातूर जिल्ह्य़ांत वीज पडून प्रत्येकी एकाचा, तर नांदेड व जालना जिल्ह्य़ांत प्रत्येकी दोघांचा वीज पडून मृत्यू झाला. दुभती जनावरे व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाल्याने अडचणीत सापडलेला शेतकरी गारपिटीने कातावला आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ात सोमवारी विविध ठिकाणी पाऊस झाला.  
 नाशिकलाही झोडपले
नाशिकमधील निफाड, सिन्नर, सटाणा, देवळा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यांत पाऊस झाला. काही भागांत गारपीट झाली. धुळ्यातील साक्री तालुक्यास पावसाने झोडपले. या पावसाने पिकांच्या नुकसानीत नव्याने भर पडली आहे. द्राक्ष बाग, कांदा, गहू, डाळिंब, टोमॅटो अशा सर्व पिकांचे नुकसान झाले.  
विदर्भात पावसाचा जोर
नागपूरसह अकोला, अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. नागपुरात सायंकाळी सातच्या सुमारास वारे आणि रात्री आठ वाजताच्या सुमारास वादळी पाऊस अशी दैनंदिनी गेल्या चार दिवसांपासून आहे.  इतर शहरात मात्र दिवसभरात कधीही वाऱ्यासह पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यासह नागरिकसुद्धा हवालदिल झाले आहेत. हवामानतज्ज्ञांनी आणखी दोन ते तीन दिवस असेच वातावरण कायम राहील, असा इशारा दिला आहे.