माळशिरसमध्ये नऊ लाखांची घरफोडी

सध्याच्या प्रचंड उकाडय़ात रात्री घराचा दरवाडा उघडा ठेवून झोपणे चांगलेच महागात पडण्याचा प्रकार माळशिरस येथे घडला. रात्री घर उघडे ठेवून झोपी गेलेल्या एका कुटुंबीयांना चोरटय़ांनी नऊ  लाखांचा ऐवज लंपास केल्याने चांगलाच फटका बसला.

माळशिरस येथील सचिन हिंमतलाल दोशी या व्यापाऱ्याने यासंदर्भात माळशिरस  पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पहाटेच्या सुमारास चोरटय़ाने त्यांचे घर फोडून ३७ तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, आयफोन, अन्य विविध कंपन्यांचे उंच्या किमतीचे सहा मोबाइल संच असा एकूण नऊ लाख ३ हजार रपये किमतीचा ऐवज चोरटय़ांनी लांबविला. दोशी कुटुंबीय माळशिरसमध्ये शहा पेट्रोल पंपाजवळ राहतात. सध्या कडक उन्हाळा असल्याने रात्रीदेखील उष्मा जाणवतो. त्यामुळे घरात दरवाजा बंद करून झोपणे असह्य़ ठरते. दरवाजा बंद करून झोपायचे म्हटले तर उकाडय़ामुळे झोप येत नाही. त्यामुळे घराचा दरवाजा बंद न करता तसाच उघडा ठेवून झोपण्याकडे कुटुंबीयांचा कल असतो. दोशी कुटुंबीयानेही रात्री झोपताना घराचा दरवाजा उघडाच ठेवला होता. तेव्हा पहाटेच्या सुमारास चोरटय़ांनी योग्य संधी साधत दोशी यांच्या घराच्या उघडय़ा दरवाजातून आत प्रवेश मिळविला. त्यावेळी दोशी कुटुंबीय आपापल्या खोल्यांमध्ये गाढ झोपी गेले होते.

यावेळी चोरटय़ांनी आठ तोळ्याचे सोन्याचे गंठण, दहा तोळ्यांच्या सोन्याच्या पाटल्या आणि बांगडय़ा, सात तोळ्यांचे बिलवर, तीन तोळ्यांचे कंठीहार, तीन तोळ्यांच्या अंगठय़ा व  कर्णफुले, तीन तोळ्यांचे पोहेहार, तीन तोळ्यांचे नेकलेस असा एकूण ३७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लांबविले. याशिवाय रोख रक्कम, एक आयफोन व अन्य सहा मोबाइल संचही चोरटय़ांच्या हाती लागले. पहाटे उशिरा दोशी कुटुंबीय झोपेतून जागे झाल्यानंतर घर फोडण्यात आल्याचे आढळून आले. माळशिरस पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची नोंद केल्यानंतर चोरटय़ांचा माग काढण्यासाठी श्वान पथकाची मदत घेतली. परंतु त्याचा उपयोग झाला नाही.

सध्याच्या असह्य़ उन्हाळ्यात रात्री घरांचे दरवाजे बंद न करता तसेच उघडे ठेवून झोपण्याच्या सवयीमुळे चोरटय़ांचे आयतेच फावत आहे. गेल्या आठवडय़ात दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताडेवाडी येथे एकाच रात्री चोरटय़ांनी तब्बल आठ घरे फोडली होती. घरफोडय़ांचे प्रमाण वाढले आहे.