नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शासकीय वात्सल्य महिला वसतिगृहातून बुधवारी सकाळी नऊ मुली पळून गेल्या. पळालेल्या सर्व मुली या बारबाला असून, याप्रकरणी पोलीसांकडे हरविल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.
गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये पोलीसांनी ठाण्यामध्ये लेडीज बारवर कारवाई करून ४१ बारबालांना पुनर्वसनासाठी नाशिकमधील वसतिगृहात ठेवले होते. त्यांच्यापैकी पाच मुली गेल्या आठवड्यात पळून गेल्या होत्या. त्यानंतर बुधवारी सकाळी आणखी १७ मुलींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यापैकी काहीजणींनी रखवालदाराच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली. त्यामुळे नऊ मुली वसतिगृहातून पळून जाण्यात यशस्वी ठरल्या. त्यानंतर मात्र उर्वरित मुलींना पळून जाण्यापासून रोखण्यात आले. या मुलींना केवळ पुनर्वसनासाठी वसतिगृहात ठेवण्यात आले होते. नऊ मुली पळून गेल्यानंतर नाशिक शहर पोलीसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. नियमांप्रमाणे पोलीसांनी या मुली हरविल्याची तक्रार दाखल करून घेतली आहे.