बाबा मला घरी परत न्या… आई मला घरी परत ने… असा आर्त टाहो पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे शिक्षणासाठी असलेल्या एका नऊ वर्षीय चिमुकल्याने फोडल्याने या बालकाचे आई-वडील चिंतेत पडले आहेत. माझ्या बालकाला घरी आणण्यासाठी प्रशासनाने मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील चिखलवाडी भागात राहणाऱ्या विठ्ठल देवराये यांनी आपला मुलगा दिनेश याला पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे एका खासगी वसतिगृहात शिक्षणासाठी ठेवले आहे. दिनेश हा सध्या तिस‍ऱ्या वर्गात शिक्षण घेत आहे. करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी राज्यात सर्वत्र लॉकडाउन करण्यात आलं आहे. या लॉकडाउनदरम्यान प्रशासनाने जिथे आहात, तिथेच राहा, असा आदेश काढला आहे. मात्र, या लॉकडाउनचा फटका एका नऊ वर्षीय दिनेश याला बसल्याने तो आळंदी येथेच अडकून पडला आहे.

या वसतिगृहात पुणे जिल्ह्यातीलच काही विद्याार्थी शिक्षणासाठी राहायला आहेत. हे सर्व विद्याार्थी आपापल्या घरी परत गेल्याने दिनेश हा एकटाच तेथे अडकून पडला आहे. दिनेश वसतिगृह चालकाकडे लॉकडाउनदरम्यान मला घरी नेऊन सोडा, असा हट्ट धरत आहे.

वसतिगृह चालकाने १४ एप्रिलपर्यंत थांब, लॉकडाउन संपला की तुला लगेच नेऊन सोडतो असे म्हणत त्याला समजावून सांगितले; परंतु पुन्हा लॉकडाउन वाढल्याने दिनेशने आता टाहो फोडण्यास सुरुवात केली आहे. आपल्या मुलाला परत आणता येत नाही, म्हणून पालकही हतबल झाले आहेत. यात त्यांना कोणताच मार्ग सापडत नसल्याने एका बाजूला पालक व्याकूळ झाले आहेत, तर दुसरीकडे एकटेपणाच्या खाईत मुलगा लोटला गेला आहे.