सांगली : मानवी कल्याणासाठी अविरत कार्यरत असलेल्या संत निरंकारी समागमच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सतगुरू सुदीक्षा महाराज यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्यावतीने सांगलीवाडी येथे सुरू असलेल्या समागम संमेलनात कौस्तुभ पुरस्कार देउन गौरवण्यात आले.
गेले तीन दिवस लाखो अनुयायांच्या उपस्थितीमध्ये शांतता, बंधूभाव आणि सन्मार्गाची शिकवण देणारे ५९ वे संमेलन सांगलीवाडी येथे उभारण्यात आलेल्या अस्थायी मंडपामध्ये सुरू आहे. या निमित्ताने रोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रवचन यांचे आयोजनही करण्यात आले होते. 360 एकर भूखंडावर हे कार्यक्रम सलग तीन दिवस सुरू होते. या कार्यक्रमासाठी राज्याच्या विविध भागासह देश विदेशातून लाखो भाविकांनी उपस्थिती लावली होती.
सोमवारी या संमेलनाच्या ठिकाणी सुदीक्षा महाराज यांना पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते मानवी कल्याणासाठी कार्यरत असलेल्या माता सुदीक्षा महाराज यांना कौस्तुभ पुरस्कार देउन गौरवण्यात आले.सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. निरंकारी मिशनच्या माध्यमातून सद्गुरू माता सुदीक्षा यांनी देश-विदेशात मानवता, सेवाभाव, शांतता आणि एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला आहे. सामाजिक सलोखा पर्यावरण संरक्षण, युवक प्रबोधन, सेदा कार्यांमधील त्यांचे योगदान समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे. याच कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने त्यांची पुरस्कारासाठी निवड केली.
