Nishikant Dubey on Raj Thackeray-Uddhav Thackeray : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा व शिवसेना शिंदे गटाच्या युतीने जोरदार मुसंडी मारली, तर उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या शिवशक्तीची मोठी पिछेहाट झाल्याचे दिसून आले. मतमोजणीच्या प्राथामिक कलानुसार, भाजपाने मुंबईत बहुतमाचा आकडा पार केला आहे. त्यामुळे देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेवर यंदा भाजपाचाच महापौर बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान मुंबईतील अभूतपूर्व यशानंतर झारखंडचे भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक सूचक पोस्ट केली.

काय म्हणाले निशिकांत दुबे?

मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या एकतेचा विजय झाला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या अस्वस्थ होण्याचे दिवस आले आहेत. मुंबईला मजबूत बनवण्यात मालक आणि मजूर सर्वांचेच योगदान आहे. विकासयुक्त, विचारयुक्त आणि भयमुक्त महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे तर रणनीतीत माहिरच आहेत. ‘मै मुंबई आकर आकर उद्धव ठाकरे जी तथा राज ठाकरेजी से मिलूँगा’, असे निशिकांत दुबे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

आणखी वाचा : लातूरमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, भाजपा-शिंदे गटाचा दारुण पराभव; महापालिकेतील सत्ता गमावली

महाराष्ट्राबाबत केलं होतं वादग्रस्त विधान

काही महिन्यांपूर्वी मुंबईत मराठी विरुद्ध हिंदी असा भाषिक वाद निर्माण झाला होता. त्यावेळी मनसैनिकांनी मराठीचा अवमान करणाऱ्या परप्रांतीयांना चोप देण्यास सुरुवात केली होती. त्यावरून भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी संताप व्यक्त केला होता. मनसैनिक महाराष्ट्राबाहेर आल्यास त्यांना पटक पटक के मारेंगे अशी धमकी त्यांनी दिली होती. त्याला प्रत्युत्तर देताना राज ठाकरे यांनी डुबो-डुबो के मारेंगे असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर दुबे यांनी ठाकरे बंधूंना भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यांच्या भूमिकेतील बदल की- राजकीय टोला असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खासदारांनी घातला होता घेराव

मराठी माणसांना उद्देशून निशिकांत दुबे यांनी केलेल्या विधानामुळे मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला होता. महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील खासदारांनी लोकसभेत दुबे यांच्या विधानांवर विरोधकांनी जोरदार हल्ला चढवला होता. त्यावेळी सभागृहात गोंधळ झाल्याने कामकाज स्थगित करावे लागले होते. त्यानंतर काँग्रेसच्या मराठी महिला खासदार वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव आणि प्रतिभा धानोरकर यांनी दुबेंना सभागृहाबाहेर पकडले. त्यांना घेरून त्यांच्या बोलण्याबाबत प्रश्न विचारले आणि जाब मागितला. हा प्रकार संसदेच्या आवारात घडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या सगळ्या वादानंतरही निशिकांत दुबे यांनी आपण मुंबईत येणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची भेट घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे दुबे आणि ठाकरे यांची भेट कशी पार पडेल? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.