Nitesh Karale Master Manikrao Thakrare argument: नीट पेपरफुटीप्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीने २० जुलै रोजी आयोजित केलेल्या चलो संसद मार्चमध्ये मोठा गोंधळ झाला. आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला तसेच, अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आंदोलनावेळी विरोधक कुठे होते? असा संतप्त सवाल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि कराळे मास्तर प्रसिद्ध असणारे नितेश कराळे यांनी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना विचारला. कराळे आणि ठाकरे यांच्यातील संवादाचा हा व्हिडीओ स्वत: कराळे यांनी प्रसिद्ध केला आहे.
आंदोलनावेळी विरोधक कुठे होते? नितेश कराळेंचा सवाल
“तीस दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. सगळ्या विरोधकांनी कालच्या (२० जुलै) आंदोलनात यायला हवं होतं, तिथं केवळ फोटोसेशन करण्यासाठी नेते आले. कालचा आणि आजचा दिवस महत्वाचा होता”, असे नितेश कराळे माणिकराव ठाकरेंना बोलताना दिसत आहेत. यावर “राहुल गांधी फोटोसेशन करत नाहीत, तेच देशभर याप्रकरणी आवाज उठवत आहेत”, असे प्रतिवाद ठाकरे करताना दिसत आहेत. “एवढं मोठं आंदोलन सुरु असताना त्याला चिरडून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. मुलांना आंदोलन कसं करायचं माहिती नाही, उपाशीपोटी ते आंदोलन करत आहेत, विरोधकांनी या सहभागी व्हायला हवं होतं”, असे नितेश कराळे म्हणत आहेत.
…तर सत्ता बदलली असती – कराळे
“विरोधकांना लाज – शर्म नाही”, अशी संतप्त टीका कराळे यांनी केली. “काल तिथं येऊन आंदोलनाचे प्रतिनिधित्व करायला हवं होतं, तळपायाची आग मस्तकात जाते”, असा संताप कराळे यांनी व्यक्त केला. दरम्यान, “तुमच्या पक्षातील लोकांना उभं करा”, असे माणिकराव ठाकरे कराळे यांना सांगताच त्यांचा पारा अधिकच चढला व त्यांनी खालच्या शब्दात टीका करण्यास सुरुवात केली. नितेश कराळेंनी यावेळी २२ विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. तसेच, “विरोधकांनी आंदोलन उचलून धरले असते तर सत्ता बदलली असती”, असेही वक्तव्य केले.
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नितेश कराळे दिल्लीत
कॉक्रोच जनता पार्टीच्या नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नितेश कराळे दिल्लीत आहेत. कराळे आंदोलनात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना तसेच, त्यांना पाणी पुरवत असल्याचे व्हिडीओ देखील त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन शेअर केले आहेत.
या देशाचा नेपाळ होऊ नये – कराळे
“आज आंदोलनस्थळी खासदारांची रांग लागली आहे. काल हे कुठे गेले होते? शंभर खासदार जरी आले असते तरी कोणाची हिम्मत नसती झाली मुलांवर लाठीचार्ज करण्याचा. काल सत्ता बदल झाला असता”, असा दावा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कराळे यांनी माध्यमांशी बोलताना केला. “सुप्रिया सुळे आंदोलनस्थळी आल्या पण त्यांनी इतरांना देखील घेऊन यायला हवं होतं, राहुल गांधींनी देखील यायला हवं होतं. इथून मोर्चा घेऊन जायला पाहिजे होते, मोदी – शाह पळून गेले असते, सत्ता बदल झाला असता”, असे कराळे म्हणाले. “या देशाचा नेपाळ होऊ नये”, असेही कराळे माध्यमांशी बोलताना म्हणाले.
