भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांना झालेल्या मारहाण प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, हा अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार अद्याप कायम आहे. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मात्र, आज नेमकं न्यायालयात सुनावणीदरम्यान काय झालं? नितेश राणेंना कोणतं कारण सांगून अटकपूर्ण जामीन अर्ज नाकारण्यात आला, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

काय आहे प्रकरण?

गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून आलं. नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात देखील या प्रकरणाचे पडसाद दिसून आले. शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते संतोष परब यांनी आपल्याला मारहाण झाल्याची तक्रार दाखल केली आहे. तसेच, आपल्याला मारहाण करणाऱ्या व्यक्तीने नितेश राणेंचं नाव घेतल्याचं देखील त्यांनी तक्रारीत नमूद केलं आहे. त्यामुळे संतोष परब यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या तक्रारीत नितेश राणेंचं नाव देखील आलं आहे.

दरम्यान, या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, दोन दिवसांच्या सुनावणीनंतर तिसऱ्या दिवशी न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. यासंदर्भात नितेश राणेंच्या वकिलांनी माहिती दिली आहे.

आता पुढे काय?

जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता उच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय असल्याचं नितेश राणेंच्या वकिलांनी सांगितलं. “उच्च न्यायालयात जाणं हा एक पर्याय आहे. याबाबत योग्य ती चर्चा करून निर्णय घेऊ. पण बहुतेक आम्हाला उच्च न्यायालयात जावंच लागेल. उद्या जरी आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, तरी त्याची सुनावणी सोमवार किंवा मंगळवारपर्यंत जाईल”, असं ते म्हणाले.

अर्ज का फेटाळण्यात आला?

दरम्यान, अटकपूर्व जामीन अर्ज का फेटाळण्यात आला, याविषयी देखील त्यांनी माहिती दिली आहे. “अद्याप न्यायालयाच्या आदेशाची प्रत आमच्याकडे आलेली नाही. मात्र, नितेश राणेंचे मोबाईल ताब्यात घेण्यासाठी कोठडी मिळणं आवश्यक असल्याचं न्यायाधीशांनी डाएसवरून सांगितलं”, असं ते म्हणाले.

आमदार नितेश राणेंना न्यायालयाचा झटका; अटकपूर्व जामीन फेटाळला!

दरम्यान, यावेळी न्यायालात उपस्थित असलेल्या सदाशिव लाड नामक व्यक्तीने एबीपीशी बोलताना या चर्चेला दुजोरा दिला आहे. “न्यायालयाने यावेळी तांत्रिक मुद्दे समोर आणले. नितेश राणे, त्यांचे सचिव आणि सचिन सातपुते यांच्यात ३३ वेळा संभाषण झालंय. त्याचे डिटेल्स पोलिसांना हवे आहेत. तसेच, नितेश राणेंकडे ७ मोबाईल फोन आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. ते फोन जप्त करून त्यातून सीडीआर रेकॉर्ड मिळवणं आवश्यक आहे. त्यासाठी कोठडी हवी असून म्हणून अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याचं न्यायमूर्तींनी सांगितलं”, असं त्यांनी नमूद केलं.

अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात धाव घेणाऱ्या नितेश राणेंना आणखी एक धक्का; जामीन मिळाला तरी…

नितेश राणे शरण येणार नाही

अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे नितेश राणेंना कधीही अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, आम्ही पोलिसांना सहकार्य करत असून पोलिसांकडून जेव्हा मागणी होईल किंवा न्यायालयाकडून आदेश दिले जातील, तेव्हा आम्ही चौकशीत सहकार्य करू, असं नितेश राणेंच्या वकीलाने सांगितलं. तसेच, “उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत नितेश राणे पोलिसांना शरण येणार नाही, त्यांच्यापासून लांब राहण्याचा त्यांना अधिकार आहे”, असं देखील त्यांनी नमूद केलं.