Nitesh Rane Targets Muslim Actors in Bollywood: मांसखरेदी हिंदू विक्रेत्यांकडूनच करायला हवी, अशी मागणी जोरकसपणे मांडणारे राज्याचे मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आता बॉलिवुड चित्रपटांबाबतही मोठं भाष्य केलं आहे. नाशिकमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या जाहीर सभेमध्ये बोलताना नितेश राणेंनी शाहरूख खान, आमिर खान यांचे चित्रपट पाहू नका, असं थेट आवाहन उपस्थितांना केलं. तसेच, असदुद्दीन ओवैसींच्या AIMIM पक्षाला त्यांनी दहशतवादी संघटना म्हणत त्यात रोहिंग्या आणि बांगलादेशी भरल्याचाही गंभीर आरोप केला. त्यांच्या या विधानांची सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.

“कशाला पाहिजेत शाहरूख खान-आमिर खानचे चित्रपट?”

धुरंदर आणि छावा हे चित्रपट चांगले चालल्यामुळे बॉलिवुडमधल्या खान लोकांचे वांदे झाल्याचा दावा नितेश राणेंनी यावेळी केला. “आज खान लोकांचे खाण्याचे वांदे झाले आहेत. कारण आमचा धुरंदर आणि छावा त्यांना भारी पडतोय. ही ताकद हिंदू समाजाची आहे. आपणही निर्धार करायला हवा की आपण चित्रपट बघणार तर हिंदू कलाकारांचेच आणि इतर लोकांना घरी बसवणार. यांच्यामुळेच ही लव्ह जिहादसारखी प्रकरणं घडतात. रणवीर सिंग, हृतिक रोशन यांचे चित्रपट आहेत ना बघण्यासारखे. त्या कलाकारांचे चित्रपट बघा. कशाला पाहिजेत ती शाहरूख खान, आमिर खानची नाटकं? त्यांची घरं भरण्यासाठी?” असं मंत्री नितेश राणे यावेळी भाषणात म्हणाले.

“लव्ह जिहादला खान लोकांचे चित्रपट कारणीभूत”

“लव्ह जिहादच्या निमित्ताने आमच्या हिंदू बहिणी जिहाद्यांच्या संपर्कात येतात. शाहरूख खाननं चार बटणं उघडली की आपले शोधायला लागतात शाहरूख खान. आमिर खाननं तिकडे काहीतरी केलं, की इकडे हेही तसं करायला लागतात. लव्ह जिहादला हे सगळे खान लोकांचे चित्रपट कारणीभूत आहेत. हिंदूंना कसं कमी दाखवायचं, हिंदूंना कसं टार्गेट करायचं हाच कार्यक्रम या खान लोकांनी केलाय”, असंदेखील नितेश राणे म्हणाले.

एमआयएम राजकीय पक्ष नसून दहशतवादी संघटना – नितेश राणे

दरम्यान, यावेळी बोलताना नितेश राणेंनी एमआयएम पक्षाची थेट दहशतवादी संघटनेशी तुलना केली. तसेच, या पक्षात रोहिंग्या आणि बांगलादेशींची भरती असल्याचाही दावा त्यांनी केला. “माझं स्पष्ट मत आहे की एमआयएम हा राजकीय पक्ष नसून दहशतवादी संघटना आहे. त्यामुळेच ही सगळी प्रकरणं बाहेर येत आहेत. जशी आयएसआय, पीएफआय, अलकायदासारखी एमआयएम संघटना आहे. कचऱ्यासारखे सगळे बांगलादेशी आणि रोहिंग्या त्या पक्षात भरून ठेवलेत”, असा आरोप नितेश राणेंनी केला.