सावंतवाडी: सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याविरोधातील चिखलफेक प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने स्थगिती दिली आहे. नितेश राणे यांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. संग्राम देसाई यांनी या प्रकरणात अपील दाखल केले होते.
४ जुलै २०१९ मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी करताना कणकवलीचे तत्कालीन आमदार नितेश राणे यांनी महामार्ग अभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदी पुलावर बोलावले होते. कामाच्या दर्जाबाबत संताप व्यक्त करत त्यांच्या अंगावर चिखल ओतण्यात आला होता आणि त्यांना चिखलातून चालत नेण्यात आले होते.याप्रकरणी प्रकाश शेडेकर यांच्या तक्रारीनुसार, नितेश राणे यांच्यासह एकूण ३० जणांवर सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण आणि इतर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणात सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने नितेश राणे यांची मुख्य कलमांतून आणि अन्य २९ संशयितांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, ‘सार्वजनिक शांततेचा भंग करणे आणि इतरांना त्यास उद्युक्त करणे’ या कलमाखाली राणे यांना १ महिना कारावास आणि १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. जिल्हा न्यायालयाच्या या शिक्षेविरोधात नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात अपील दाखल केले होते. यावर सुनावणी होऊन न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे, अशी माहिती त्यांचे वकील संग्राम देसाई यांनी दिली.
