सोलापूर : होय, हे हिंदुराष्ट्रच आहे. हिंदुत्ववादी विचारच देशाला तारू शकतात. हिंदुत्ववादी विचारच देशाचे मूळ आहे. हा हिंदुत्ववाद प्रत्येकाला स्वीकारावाच लागेल, असे विधान भाजपचे वादग्रस्त नेते, मत्स्यव्यवसाय विकासमंत्री नितेश राणे यांनी केले आहे.
गुरुवारी सोलापुरात राणे आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हिंदुत्ववादावर कडवट मते मांडली. ते म्हणाले, आपल्या देशाचे मूळ हिंदुत्वच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातील मसुद्यात धर्मनिरपेक्ष हा शब्दच नव्हता. नंतर काँग्रेस पक्षाने तो शब्द जन्माला घातला. आता देशातील काँग्रेस पक्षासह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना हिंदुत्ववादी विचार पटू लागला आहे. म्हणूनच भाजपसह शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश करणाऱ्या नेत्यांची गर्दी झाली आहे, असे मत राणे यांनी व्यक्त केले.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे दोघे एकत्र येण्याची चर्चा सुरू असल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राणे यांनी उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांकडून राज ठाकरे यांचा वारंवार कसा आणि कितीवेळा त्रास देऊन अपमान केला गेला, याचा विचार करता,‘मातोश्रीवरचा नरक’ या नावाने एक स्वतंत्र पुस्तक तयार होईल, असा टोला त्यांनी लगावला. राज आणि उद्धव दोघेही एकत्र आले तर आपणांस आनंदच वाटेल. परंतु राज ठाकरे मातोश्रीवर आपला वारंवार झालेला अपमान कधीही विसरणार नाहीत, असेही मत राणे यांनी व्यक्त केले.
सोलापुरात अलीकडे एका भागात झालेल्या हाणामारीत जखमी झालेल्या एका तरुणाच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची नितेश राणे यांनी भेट घेतली. नंतर जवळच्या एका मंदिरात महाआरतीही केली. यासंदर्भात भाष्य करताना त्यांनी सोलापुरात हिरव्या सापांची वळवळ चालू देणार नाही, असा इशारा दिला. यावेळी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख उपस्थित होते.