मुंबई महापालिकेच्या प्रदूषणमुक्त दिवाळीच्या जनजागृती मोहिमेवरून वाद निर्माण झाला आहे. या मोहिमेत अभिनेत्री दिया मिर्झाच्या एका व्हिडीओवर भाजपाचे नेते अमित साटम यांनी आक्षेप घेतला. अमित साटम यांनी आक्षेप घेताच मुंबई महापालिकेने तो व्हिडीओ अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून हटवला. ‘दिवाळी कशी साजरी करावी हे दिया मिर्झाने आम्हाला शिकवू नये’, अशा शब्दांत अमित साटम यांनी संताप व्यक्त केला.

दिया मिर्झाच्या व्हिडीओवरून आणि मुंबई महापालिकेच्या दिवाळी कॅम्पेनवरुन वाद निर्माण झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. यावर मंत्री नितेश राणे यांनीही प्रतिक्रिया देत आक्रमक भूमिका मांडत काही सवाल विचारले आहेत. ‘दिया मिर्झासारखे लोक केवळ हिंदू सणांच्या वेळीच पर्यावरणपूरकतेचा सल्ला देतात. मात्र, ईद किंवा मोहरमच्या वेळी शांत राहतात’, असं म्हणत दिया मिर्झासारखे लोक सनातनविरोधी असल्याची टीका राणे यांनी केली. ते आज (२ नोव्हेंबर) माध्यमांशी बोलत होते.

मंत्री नितेश राणे काय म्हणाले?

“अभिनेत्री दिया मिर्झाने दिवाळीबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. मात्र, ईद, मोहरम किंवा बकरी ईदच्यावेळी दिया मिर्झा कधीही असं ट्विट किंवा पोस्ट करत नाही, किंवा असा सल्ला देत नाही. हे लोक केवळ होळीच्या वेळी पर्यावरणपूरकबाबत बोलतात. त्यांनी रमजान आणि बकरी ईदच्या वेळीही पर्यावरणपूरकबाबत बोलायला हवं. त्यांच्यासारखी माणसं सनातन हिंदू धर्माच्या विरोधात आहेत. मी या विषयावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन आणि भविष्यात अशा गोष्टी रोखण्यावर भर देईन”, असं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

दिया मिर्झाने व्हिडीओत काय म्हटलं होतं?

“दिवाळी उत्सव जवळ आला आहे. उत्सव साजरा करत असताना आपल्याला पर्यावरण आणि आरोग्य या दोन्हीची काळजी घ्यायची आहे. फटाक्यांमुळे होणारं ध्वनी आणि वायू प्रदूषण हे आपल्या सगळ्यांसाठी हानीकारक आहे. माझं तुम्हाला आवाहन आहे की दिवाळी आवाजांनी नाही तर आनंदांनी साजरी करा. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!”, असं दिया मिर्झाने म्हटलं होतं. दरम्यान, दिया मिर्झाचा हा व्हिडीओ महापालिकेने डिलिट केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

पावसाळा संपताच मुंबईच्या वायु प्रदुषणात वाढ झाली आहे. दिवाळीत फटाक्यांचा धूर यामुळं हवेचा स्तर आणखी खालावू शकतो. यावर उपाययोजना म्हणून मुंबई महानगरपालिकेने दिवाळी सेलिब्रिटी कॅम्पेन सुरू केलं होतं. मात्र आता या महापालिकेच्या या कॅम्पेनवरुन वाद रंगला आहे. भाजपा नेते अमित साटम यांनी आक्षेप घेतला आहे. मुंबई महापालिकेने एक व्हिडीओ ट्विट केला होता. यात अभिनेत्री दिया मिर्झा मुंबईकरांना पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याबाबत अवाहन करत आहे. दिवाळीत फटाके फोडून ध्वनीप्रदुषण टाळा, असं दिया मिर्झाने व्हिडीओत म्हटलं होतं.