एका आठवड्याचा अल्टिमेटम, नाहीतर….; नितेश राणेंचा जावेद अख्तर यांना इशारा

अख्तर यांच्या या वक्तव्याचा सर्वच पक्षांकडून निषेध व्यक्त केला जात आहे.

ज्येष्ठ कवी लेखक जावेद अख्तर यांनी तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन देशभरातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आज भाजपा आमदार नितेश राणे यांनी अख्तर यांनी इशारा दिलाय. आठवड्याभरात जाहीरपणे चर्चा करा किंवा माफी मागा, असं आव्हान राणे यांनी दिलं आहे.

जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणारे देखील तालिबानी विचारसरणीचे असल्याचं खळबळजनक वक्तव्य केलं होतं. त्याचे पडसाद सध्या उमटत आहेत. यावरच प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांनी जावेद अख्तर यांना जाहीर पत्र लिहिलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी ते शेअरही केलं आहे.


आपल्या ट्विटमध्ये राणे म्हणतात, मी तुम्हाला एका आठवड्याचा अल्टिमेटम देत आहे. एक तर तुम्ही सार्वजनिक मंचावर अथवा माध्यमांसमोर येऊन तुमच्या वक्तव्याचं स्पष्टीकरण द्या. आम्ही तुमच्या सर्व द्वेष आणि गैरसमजांना उत्तर देण्यासाठी तयार आहोत. किंवा तुम्ही सगळ्या हिंदुंची बिनशर्त माफी मागू शकता.

अख्तर यांच्या या वक्तव्याचा सर्वच पक्षांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. ‘हिंदू राष्ट्र’ संकल्पनेस पाठिंबा देणारे तालिबानी विकृतीचे आहेत, असे कसे म्हणता येईल? असा प्रश्न उपस्थित करतानाच मागच्या काळात ‘बीफ’ प्रकरणावरून जो धार्मिक उन्माद घडला व त्या सर्व प्रकरणात जे झुंडबळी गेले, त्याचे समर्थन शिवसेनाच काय तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही केलेले नाही, असं म्हणत अख्तर यांनी तालिबानशी केलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना ही चुकीचं असल्याचं मत शिवसेनेनं व्यक्त केलं आहे. यावरुनच आता भाजपाचे आमदार राम कदम यांनी थेट जावेद अख्तर यांच्या अटकेची मागणी केलीय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nitesh rane open letter to javed akhtar on his statement vsk