सध्या राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान विधानसभा आणि विधानपरिषदेत विविध विषयांवर चर्चा पार पडत असल्याचं पाहायला मिळतं. या अधिवेशनाच्या दरम्यान सत्ताधारी आणि विरोधक अनेकदा विविध प्रश्नांवरून आमने-सामने आल्याचंही पाहायला मिळतं. तसेच सभागृहात अनेकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जंपुल्याचं पाहायला मिळतं. मात्र, आज विधानभवनात एक वेगळं चित्र पाहायला मिळालं आहे.
शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते तथा मंत्री नितेश राणे हे या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान विधानभवनाच्या परिसरात आमने-सामने आले असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या पाठीवर थाप दिली. विधानभवनाच्या परिसरात हा एक दुर्मिळ क्षण पाहायला मिळाला. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
भारतीय जनता पक्षाचे नेते तथा मंत्री नितेश राणे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे हे कायम एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळतात. राजकारणातील कट्टर प्रतिस्पर्धी म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. एवढंच नाही तर राजकीय वर्तुळात अनेकदा राणे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगल्याचं आपण पाहिलं. मात्र, आज महाराष्ट्राला एक वेगळं चित्र पाहायला मिळालं आहे.
आमदार आदित्य ठाकरे आणि भाजपाचे नेते तथा मंत्री नितेश राणे हे विधानभवनात आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले आहेत. यावेळी झालं असं की, आमदार आदित्य ठाकरे हे विधानभवनात माध्यमांशी बोलत होते. मात्र, यावेळी मंत्री नितेश राणे हे देखील त्या ठिकाणी आले. पण आदित्य ठाकरे माध्यमांशी बोलत असल्यामुळे नितेश राणे हे त्या ठिकाणी काहीवेळ बाजूला थांबले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांचं माध्यमांशी बोलणं संपल्यानंतर ते तेथून चालले असताना मंत्री नितेश राणे हे माध्यमांशी बोलण्यासाठी पुढे आले.
पण यावेळी मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या पाठीवर थाप दिली आणि म्हणाले की, “तुमच्या आणि माझ्यासाठीच मीडियावाले थांबले आहेत.” दरम्यान, मंत्री नितेश राणे यांच्या या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांनी देखील स्मितहास्य केलं, त्यानंतर नितेश राणे यांनीही स्मितहास्य केलं आणि दोघेही पुढे निघून गेले. या दुर्मिळ क्षणाचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
