“संजय राऊतांचा घर फोडण्याचा इतिहास आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये भांडणं लावण्यात ज्या काही व्यक्ती पुढे होत्या त्यात संजय राऊतांचा समावेश होता. आता त्यांची मजल छत्रपतींचं घर फोडण्यापर्यंत गेलीय,” अशी गंभीर टीका भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी सोमवारी सायंकाळी कोल्हापूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण आरोप प्रत्यारोपांमुळे तापलेलं असतानाच याच मुद्द्यावरुन नितेश राणेंनी थेट श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेणार संजय राऊतांवर निशाणा साधलाय.

नक्की वाचा >> “किमान राजघराण्यातील व्यक्तींनी…”; संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत निलेश राणेंचा छत्रपतींच्या घराण्याला सल्ला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“संजय राऊतांनी याआगोदर ठाकरेंचं घर फोडलेलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये भांडण लावण्यामध्ये जे काही व्यक्ती पुढे होते त्यात संजय राऊत होते. घरं फोडायची कशी याचा चांगला इतिहास संजय राऊतांचा आहे. हे काय त्यांच्यासाठी नवं नाही,” असा टोला नितेश राणेंनी संजय राऊतांसंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना लागवला.

“तुम्हाला आठवत असेल राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडलेली तेव्हा त्यांच्या समर्थकांनी यांची (संजय राऊतांची) गाडी फोडलेली. आपल्याला खूप लोकांना आठवत असेल ती का तोडलेली कारण संजय राऊतांनी दोन्ही भावंडांमध्ये आग लावण्याचं काम केलेलं,” असंही निलेश राणे म्हणालेत. पुढे बोलताना निलेश राणेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचाही उल्लेख केला. “असंख्य वेळा बाळासाहेब ठाकरेंनी याचा उल्लेख त्यांच्या भाषणामध्ये केलेलाय, की आमच्या घरामध्ये आग लावली जातेय,” असं नितेश राणे म्हणाले.

नक्की वाचा >> “भाजपानेच संभाजीराजेंची कोंडी केली, राजे फडणवीसांना भेटले व पाठिंब्यासाठी…”; राज ठाकरेंचाही उल्लेख करत शिवसेनेचा हल्लाबोल

संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत अशा लोकांना सुरक्षारक्षकांची गरज नाही असं म्हणताच आता संजय राऊत छत्रपतींच्या घरात आग लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नितेश यांनी केलाय. “हा काल ठाकरेंच्या घरात आग लावत होता आज छत्रपतींच्या घरापर्यंत पोहचण्याची याची मजल गेलीय. म्हणून कधीतरी त्यांच्या आजूबाजूच्या बॉडीगार्डला १० मिनिटं सुट्टी दिली पाहिजे किंवा सुट्टीवर पाठवा. अशा लोकांना अंगरक्षकांची गरज नाही. थोडा मराठा समाजाने त्याचा ताबा घेतला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या घरी त्यांने आग लावली आज छत्रपतींच्या घरी आग लावलेली आहे,” असं नितेश राणे म्हणालेत. “हा जो आग लावण्याचा इतिहास आहे. ही आग लावण्याची हिंमत संजय राऊत करतोय हे कधी ना कधीतरी त्याला मोजायला लागणार हे मी तुम्हाला नक्की सांगतो,” असंही नितेश राणेंनी म्हटलंय.

नितेश राणे यांनी राऊतांवर टीका करताना त्यांची तुलना शाहू महाराजांच्या श्वानाशी केली. “शाहू महाराजांचं मी खरंच कौतुक करीन की त्यांनी अतिशय योग्य जागी त्यांनी संजय राऊतांना बसवलं. कसंय एका बाजूला त्यांचा कुत्रा बसलेला दुसऱ्या बाजूला संजय राऊत बसलेला. बरोबर जागी त्यांना ते स्थान बरोबर दिलं. एक त्याचा पालतू होता. दुसरा कोणाचा पालतू आहे उभ्या महाराष्ट्राला माहितीय. कोणाच्या बिस्कीटावर नाचतो तो. म्हणून त्यांनी बरोबर स्थान दिलं त्याला,” असं नितेश राणे राऊत यांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले.

नक्की वाचा >> “किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने भारतातील सामान्य जनता…”; सोमय्यांचा हसरा फोटो शेअर करत NCP च्या मिटकरींचा टोला

देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिला असता तर संभाजीराजेंना नक्कीच त्यांनी निवडून आणलं असतं असंही नितेश राणे म्हणाले. “संभाजीराजेंना जो मानसन्मान भाजपाने दिलाय, देवेंद्र फडणवीसांनी दिलाय, पंतप्रधान मोदींनी दिलाय, अमित शाहांनी दिलाय. कधी संभाजीराजेंना विचारा त्यांच्या सहा वर्षाच्या खासदारकीमध्ये त्यांना काय मानसन्मान दिलाय. उद्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांना शब्द दिला असता की चला तुम्हाला खासदारकी देतो किंवा तुम्हाला अपक्ष म्हणून निवडून आणतो. १०१ टक्का निवडून आलं असतं. त्याला देवेंद्र फडणवीस म्हणतात, उद्धव ठाकरे म्हणत नाही. शब्द फिरवणारा त्याला उद्धव ठाकरे म्हणतात,” अशी टीका नितेश राणेंनी केलीय.

नक्की वाचा >> आव्हाडांनी केली शाहू महाराज आणि शरद पवारांची तुलना; ‘बहुजनवाद विरुद्ध मनूवाद’ मथळ्याखालील पोस्टमध्ये म्हणाले, “सनातनी आणि…”

नितेश राणे यांनी पुढे बोलताना, उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवणे “हे काय नवीन नाहीय. कुठलाही ज्याला शिवसेनेचा इतिहास माहितीय, राणेंना विचारा, राज ठाकरेंना विचारा ज्यांनी जुनी शिवसेना पाहिलेलीय. प्रत्येकजण बोलेल की हा माणूस असाच आहे. शब्द फिरवण्यात आणि खोटं बोलण्याचा उद्धव ठाकरेंचा इतिहासच आहे. नवीन काय आहे त्यामध्ये? तो माणूस असाच आहे. आज महाराष्ट्राला त्याची ओळख होते. संभाजीराजेंनी त्याच्यावर विश्वास करण्याआधी दोनदा विचार करायला हवा होता. उद्धव ठाकरे म्हणजे देवेंद्र फडणवीस नाहीत,” असंही नितेश राणे म्हणालेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitesh rane slams sanjay raut says he was main cause for fight between uddhav and raj thackeray scsg
First published on: 31-05-2022 at 08:32 IST