भाजपा आमदार नितेश राणेंचा जामीन अर्ज आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने फेटाळला. शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित असलेल्या नितेश यांना जामीन नाकारला जाणं हा त्यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. हा जामीन नाकारल्यानंतरही सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून दहा दिवसांचं संरक्षण दिल्याने पोलिसांनी नितेश राणेंना ताब्यात घेतलं नाही. मात्र नितेश राणे सुनावणीनंतर न्यायालयाबाहेर आल्यावर त्यांची गाडी आडवून ठेवल्याने निलेश राणे आणि पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. पोलीस न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करत असल्याचं निलेश राणे पोलिसांना म्हणाले. या सर्व प्रकरणासंदर्भात नितेश राणेंच्या वकिलांनीही संताप व्यक्त करणारी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांकडे नोंदवताना त्यांनी कणकवली पोलिसांवर गंभीर आरोप केलाय.
न्यायालयाबाहेर घडलं काय..
न्यायालयाने नितेश राणेंना जामीन अर्ज नाकारल्यानंतर ते कोर्टातून निघत असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. यावेळी त्यांचे बंधू आणि माजी खासदार निलेश राणे गाडीतून खाली उतरले आणि पोलिसांना गाडी का थांबवली असा जाब विचारला. यावेळी त्यांचे समर्थकही आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशापेक्षा काय महत्वाचं आहे ते सांगा अशी विचारणा यावेळी त्यांनी केली. कोणत्या अधिकाराखाली गाडी अडवली जात आहे अशी विचारणा त्यांनी केली. सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले असतानाही आमच्या पुढे मागे पोलिसांचा पहारा का ठेवला जात आहे? असं विचारत त्यांनी संताप व्यक्त केला.
नितेश राणेंचे वकीलही संतापले
नितेश राणेंची बाजू मांडणारे वकील सतीश मानेशिंदे यांनीही या घडलेल्या प्रकारासंदर्भात नाराजी व्यक्त केली. कणकवली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केलाय असं सतीश मानेशिंदे म्हणाले. “सर्वोच्च न्यायालयाने दहा दिवसांची मुदत दिल्यामुळे नितेश राणेंना कस्टडीमध्ये घेता येणार नाही,” असं नितेश यांच्या वकिलांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना, “आज ज्या पद्धतीने गाडी आडवण्यात आली ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन आहे का?”, असा प्रश्न विचारला.
नक्की वाचा >> नितेश राणेंना हा मागच्या दारानं दिलेला जामीन; सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर मांडली भूमिका
“ही पोलिसांची दादागिरी आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन आहे,” असं यावर उत्तर देताना सतीश मानेशिंदे म्हणाले. तसेच पुढे बोलताना, “त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये नितेश राणेंना अटक करायची आहे, ते कधी होणार नाही,” असंही नितेश राणेंच्या वकिलांनी स्पष्ट केलं. तर नितेश राणेंची वकिली करणाऱ्या अन्य एका वकिलाने घडलेल्या सर्व प्रकारावरुन पोलिसांना काय हवंय ते दिसतंय, अशी टीका केली.
नितेश राणेंची गाडी का अडवली
निकालानंतरची कागदोपत्री पूर्तता, नोटीस आणि इतर पूर्तता करताना न्यायालयाबाहेर नितेश राणेंची गाडी अडवून ठेवण्यात आली होती, असं सरकारी वकील प्रदीप घरत यांनी स्पष्ट केलं. न्यायालयाबाहेरच्या गोंधळानंतर नितेश राणे पुन्हा एकदा न्यायालयाच्या इमारतीमध्ये गेले. मात्र न्यायालयाने औपचारिकता पूर्ण करण्यासाठी दोन्ही बाजूच्या वकिलांना पुन्हा बोलवलं होतं असं सरकारी वकील म्हणाले. “आता ऑर्डर झाली म्हणून संपलं असं त्यांना वाटलं होतं. आम्ही अर्ज केला आहे त्यावर तुम्हाला म्हणणं मांडायचं आहे. त्यामुळे परत चला हे सांगण्यासाठी नितेश राणेंना थांबवण्यात आलं होतं. त्यांचे वकील पुन्हा कोर्टात आले होते. सर्वांना थांबणं भाग होतं त्यामुळे नितेश राणेंना थांबवलं,” असं प्रदीप घरत यांनी सांगितलं आहे.