Nitin Gadkari Mumbai Pune Expressway: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी चांगल्या कामांना प्रसिद्ध मिळत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. २७ वर्षांपूर्वी बांधलेला मुंबई – पुणे महामार्ग आत्ता देखील उत्तम स्थितीत आहे पण, त्याबाबत कुठं लिहलं जात नाही, चर्चा होत नाही, असे गडकरी पुण्यात बोलत असताना म्हणाले. राज्य महामार्गावर खड्डा पडला तरी मलाच दोष दिला जातो, सोशल मीडियावर ट्रोल केले जाते, अशा शब्दात गडकरींनी नाराजी व्यक्त केली.

मुंबई – पुणे द्रुतगतीमहामार्गाचा संदर्भ

नितीन गडकरींनी सोमवारी विचारवंत महोत्सव व्याख्यानमालेत हजेरी लावली. यावेळी गडकरींनी रस्ते आणि महामार्ग विकासावर भाष्य केले. “२७ वर्षांपूर्वी मी मुंबई पुणे द्रुतगतीमहामार्ग तयार केला. आजवर या महामार्गावर एकही खड्डा तयार झाला नाही, महामार्ग उत्तम स्थितीत आहे. पण, याबाबत कधीही बातमी प्रसिद्ध होत नाही”, असे नितीन गडकरी म्हणाले. गडकरींनी यावेळी राज्य महामार्गावर देखील जरी खड्डे पडले तर त्यांना दोष दिला जातो अशी खंत व्यक्त केली.

मिसिंग लिंकवरुन भाष्य

गडकरींनी अलिकडच्या मिसिंग लिंकवर पडलेल्या खड्ड्यांचा संदर्भ यावेळी दिला. “माझ्या कार्यकाळात वन विभागाने याला परवानगी दिली नाही. त्यामुळे मला मिसिंग लिंक उभारता आली नाही. आता राज्य सरकारने मिसिंग लिंक उभारली आहे. पण, याच्याशी निगडीत समस्या समोर आल्या त्यावेळी माझ्यावर टीका करण्यात आली. महाराष्ट्र सरकारने उभारलेला प्रकल्प असला तरी, सोशल मीडियातून माझ्यावर टीका झाली”, अशी खंत गडकरींनी व्यक्त केली. सोशल मीडिया क्वॉलिटी कंट्रोल एजंट सारखा काम करत असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले.

सोशल मीडिया

“सोशल मीडिया क्वॉलिटी कंट्रोलसाठी फायदेशीर ठरत आहे. गोष्टी कुठे चुकीच्या झाल्या, समस्या कुठे निर्माण झाली हे शोधण्यासाठी याचा फायदा होत आहे”, असे गडकरी म्हणाले. गडकरींनी यावेळी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी रस्त्यांचे विषद केलेले महत्व याचा संदर्भ दिला. “अमेरिकेतील रस्ते अमेरिका श्रीमंत आहे म्हणून चांगले नाहीत तर, रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे”, या केनडी यांच्या ऐतिहासिक वक्तव्याचा संदर्भ गडकरींनी दिला. रस्ते दुरुस्तीसाठी खड्डे भरुन काढणे हा पर्याय उपयुक्त ठरणार नाही, असेही गडकरी म्हणाले. रस्ते विकासाचा थेट संबंध आर्थिक विकासाशी असतो असेही गडकरी यावेळी म्हणाले.