देशभरात रस्त्यांचे जाळे विणणारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी शनिवारी मुंबईच्या भीषण वाहतूक कोंडीत अडकले. वरळी ते कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी गडकरींना तब्बल एक तास उशीर झाला. मात्र, या परिस्थितीवर संताप व्यक्त न करता त्यांनी अत्यंत दिलखुलासपणे, “हा माझ्याच जुन्या चुकांचा परिणाम आहे,” अशी कबुली दिली आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. या संदर्भातील वृत्त ‘इंडिया टूडे’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

मुंबईत पार पडलेल्या ‘इंडो-अमेरिकन कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड्स’ सोहळ्यात गडकरी बोलत होते. वाहतूक कोंडीच्या या अनुभवाचा धागा पकडत त्यांनी देशातील पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणावर आणि भारत-अमेरिका तंत्रज्ञान सहकार्यावर भर दिला.

‘१९९५ मधील तंत्रज्ञान आज अपुरे’

आपला किस्सा सांगताना गडकरी म्हणाले, “आज या कार्यक्रमाला पोहोचायला मला एक तास उशीर झाला, कारण मी वरळीहून निघाल्यावर ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. पण खरे सांगायचे तर, मी माझ्याच चुकीची भरपाई करत आहे. १९९५ ते २००० या काळात महाराष्ट्राचा सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना मला मुंबईत ५५ उड्डाणपूल, वांद्रे-वरळी सी लिंक आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे बांधण्याची संधी मिळाली. पण त्या काळात आजचे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते.”

“गेल्या काही दशकांत वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे जुन्या तंत्रज्ञानावर आधारित हे पूल आता अपुरे पडत आहेत. त्यामुळे पारंपरिक डिझाइनवर अवलंबून न राहता जुने उड्डाणपूल हटवून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्ला मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यासाठी ५० हजार कोटींचा बहुस्तरीय ‘मल्टी-लेव्हल’ प्लॅन

शहरी भागातील ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी गडकरींनी नवीन तंत्रज्ञानाचा मार्ग दाखवला. “पुण्यासाठी ५० हजार कोटी रुपयांचा पायाभूत सुविधा प्रकल्प प्रस्तावित आहे. यासाठी मलेशियाकडून विशेष तंत्रज्ञान आणले गेले आहे. या तंत्रज्ञानामुळे एकाच खांबावर (Pillars) अनेक स्तरांचे (Multi-level) उड्डाणपूल उभारता येतील, ज्यावर सर्वात वरच्या स्तरातून मेट्रो धावू शकेल,” अशी माहिती गडकरींनी दिली.

‘भारताची क्षमता आणि अमेरिकेचे तंत्रज्ञान’

भारत आणि अमेरिकेतील आर्थिक व धोरणात्मक सहकार्यावर बोलताना ते म्हणाले, “काही लोक समस्यांचे रूपांतर संधींमध्ये करतात, तर काही जण संधींचे रूपांतर समस्यांमध्ये करतात. आपण आव्हानांचा स्वीकार केला पाहिजे. भारताकडे प्रचंड क्षमता आहे, तर अमेरिकेकडे संसाधने आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. या दोन्हींचा मेळ घालून आपण जगासाठी ‘विन-विन’ (दोघांचाही फायदा होणारी) स्थिती निर्माण करू शकतो.”

तंत्रज्ञान, संशोधन, ज्ञान आणि नवसंशोधन हेच भारताच्या आर्थिक विकासाचे प्रमुख आधारस्तंभ राहतील, असे सांगत गडकरी यांनी कृषी आणि संरक्षण क्षेत्रासह विविध उद्योगांमध्ये अमेरिकेसोबत भागीदारी वाढवण्याचे आवाहन केले.

भारतीय ऑटोमोबाईल उद्योग जगात तिसऱ्या क्रमांकावर

आपल्या मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यापासून ऑटोमोबाईल क्षेत्रात झालेल्या क्रांतीचा उल्लेख करताना गडकरी म्हणाले, “भारताने जपानला मागे टाकत जगातील तिसरी सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ बनण्याचा मान मिळवला आहे. आता भारताच्या पुढे केवळ अमेरिका आणि चीन हेच दोन देश आहेत.”

मुंबई आणि पुण्यासारख्या मेट्रो शहरांमध्ये वाढत्या ट्रॅफिकवर मात करण्यासाठी आता पारंपरिक बांधकामापेक्षा आधुनिक आणि बहुस्तरीय अभियांत्रिकी वापरणे हाच एकमेव शाश्वत पर्याय असल्याचे गडकरींच्या या भाषणातून स्पष्ट झाले आहे.