Nitin Gadkari on CM : राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती उभी ठाकली आहे. मागच्या वेळी मुख्यमंत्री पदाच्या गणितावरून फिस्कटल्याने राज्याने राजकीय उलथापालथ पाहिली. त्यामुळे यंदा कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्वाचंं लक्ष आहे. यावरून चढाओढ सुरू असली तरीही आमच्याकडे तस काही नाही अशी भूमिका स्पष्ट केली जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत विधान केलं आहे. ते लोकसत्ताने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.
राज्याचा मुख्यमंत्री कोण असावा? भाजपचा असावा असे वाटत नाही का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “आजकाल समझोत्याचे राजकारण सुरू झाले आहे. यात संख्याबळाला फारसे महत्त्व नाही. अनेकदा राजकीय सोयसुद्धा लक्षात घेऊन निर्णय घेतले जातात. व्यक्तिश: म्हणाल तर पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्याने भाजपचा मुख्यमंत्री व्हावा असे मला वाटते.”
हेही वाचा >> Nitin Gadkari : योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’पेक्षा गडकरींची भूमिका वेगळी? म्हणाले, “निवडणुकीत एकाच मुद्यावर यश मिळेल”
काही दिवसांपूर्वी अमित शाहांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पद देणार असे सुतोवाच केले होते. यावरून गदारोळ झाल्यानंतर अमित शाह म्हणाले की, आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरीही पण निवडणुकीनंतर आम्ही सगळे बसून याबद्दल विचारमंथन करू, असं अमित शाहा म्हणाले.
बटेंगे तो कटेंगे’बाबत गडकरींकडून भूमिका स्पष्ट
नितीन गडकरी यांना विचारण्यात आलं होतं की ‘बटेंगे तो कटेंगे ’, ‘एक है तो सेफ है’ या घोषणांकडे तुम्ही कसे बघता? यावर ते म्हणाले, “निवडणुकीच्या काळात प्रत्येकाची प्रचाराची एक पद्धत असते. त्यातून या घोषणा दिल्या जात असाव्यात. मी मात्र याकडे संघाच्या हिंदुत्वाच्या व्याख्येतून बघतो. ही व्याख्या सर्व भारतीयांना सामावून घेणारी आहे. भारतीयत्वाशी जोडणारी आहे. यात जात, धर्म, पंथ भेदाला स्थान नाही. अलीकडे आपल्याला शेजारी राष्ट्रांकडून धोका वाढला आहे. पाकिस्तानचे दहशतवादी भारतात येतात, हल्ले करतात. बांगलादेशचे घुसखोर येतात. या सर्वांपासून सावध राहण्यासाठी संपूर्ण भारतीयांनी एक होणे गरजेचे आहे. कदाचित त्यातून ही घोषणा जन्माला आली असावी. मीसुद्धा त्याकडे याच दृष्टिकोनातून बघतो”.
निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाप्रणित महायुती सरकारने केलेली कामं पुरेशी : गडकरी
नितीन गडकरी म्हणाले, घोषणांच्या गरजेविषयी मी बोलणे योग्य नाही. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो आणि व्यक्तीही वेगवेगळे असतात. विकासाचे म्हणाल तर गेल्या दहा वर्षांत आमच्या सरकारने देश व राज्याचा भरपूर विकास केला आहे. आणि त्याच आधारावर यावेळची निवडणूक आम्ही जिंकू. हा एकच मुद्दा यश मिळवण्यासाठी पुरेसा आहे असे मला वाटते.
k