Nitin Gadkari : आपल्याला महाराष्ट्रात शिवशाही आणायची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आत्मा हिंदुत्व हाच होता असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. आज भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमात झालेल्या भाषणात नितीन गडकरी यांनी त्यांचे विचार मांडले.
हिंदुत्व हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आत्मा-गडकरी
येणारा काळ हा मोठा आव्हानात्मक काळ आहे. आपल्याला हे सिद्ध करुन दाखावयचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत आहे. शिवाजी महाराजांबाबत हे म्हटलं जात होतं की ते खऱ्या अर्थाने आदर्श राजे होते. यशवंत, किर्तीवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारु अखंड स्थितीचा निर्धारु श्रीमंत योगी. अशा छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही या महाराष्ट्रात आणायची आहे. शिवाजी महाराज आदर्श शासक होते, आदर्श पुत्र होते, आदर्श पिता होते. त्यांनी आपलं राज्य चालवत असताना स्वराज्याचं रुपांतर सुराज्यात केलं होतं. हिंदुत्व हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आत्मा होता. हिंदुपतपातशाही स्थापन झाली पाहिजे हे शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं.
हिंदुत्व हा संकुचित शब्द नाही
हिंदुत्व हा संकुचित शब्द नाही. सुप्रीम कोर्टाने हिंदुत्वाची व्याख्या केली आहे वे ऑफ लाईफ. धर्माचा अर्थ कर्तव्य म्हणून असतो. शिक्षक म्हणतो शिक्षक धर्माचं मी पालन करतो आहे, पत्रकार म्हणतात पत्रकार धर्माचं मी पालन करतो आहे. या ठिकाणी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे, हिंदुत्व हेच भारतीत्व आहे. येणाऱ्या काळात हिंदुत्व हे कुठल्या धर्माच्या विरोधात नाही, ज्या सेक्युलरवादाचा प्रचार केला जातो त्याचा अर्थ धर्मनिरपेक्षता सांगितला जातो, पण खऱ्या अर्थाने सेक्युलर शब्दाचा अर्थ हा सर्वधर्मसमभाव आहे. समतेच्या आधारावर, समरसतेच्या आधारावर आपण संकल्प केला आहे. आपलं राजकारण हे विकासाचं राजकारण आहे. पाणी, उद्योग, शेती, उद्योग या सगळ्या क्षेत्रात भरारी आपल्याला घ्यायची आहे, असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
भारताचा विकास हा महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित आहे-गडकरी
प्रत्येक क्षेत्रात आपण पुढे जात आहोत. भारताचा विकास हा महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातला विकसनशील महाराष्ट्र आणि यामागे उभं असणारं संघटन या दोन्हींच्या संकल्पातून आपण शिवशाही महाराष्ट्रात आणण्याचा निर्णय केला आहे. येणाऱ्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात आपला पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेली शिवशाही आणल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला आहे असंही नितीन गडकरी म्हणाले.
रवींद्र चव्हाण यांचं नितीन गडकरींकडून कौतुक
एक संघर्ष करणारा कार्यकर्ता आपल्या पक्षाचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाला आहे याचा मला मनस्वी आनंद झाला आहे असंही या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. तसंच रवींद्र चव्हाण यांनी संघर्ष करुन या पदापर्यंत मजल कशी मारली आहे हेदेखील गडकरी यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं.