रत्नागिरी – सर्वच ठिकाणी नेमण्यात आलेल्या प्रशासकानी लूटमार सुरु केली आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या कामात देखील कमिशनखोरी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. एकवेळ केंद्राचे रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी या मार्गावरुन प्रवास करावा. तेव्हा येथील कामाच्या गुणवत्तेवरुन समजेल अधिकारी टक्केवारी घेण्यात किती व्यस्त आहेत, असे शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी राऊत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करून अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची पाहणी करण्याचे आवाहन केले. तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचे त्यांनी सांगितले. राऊत म्हणाले, गुन्हेगार पोलिसांना मित्र समजत आहेत. वैष्णवी हगवणे प्रकरणावरुन राज्य सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. राज्य सरकारच्या हातातून कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे निसटली आहे, अशी टीका त्यांनी केली. तसेच कोकणातील शेतकऱ्यांविषयी सत्ताधारी आणि मंत्र्यांना कोणतीही आपुलकी नसल्याचे त्यांनी सांगितले.
धुळे गेस्ट हाऊसमध्ये ५ कोटी रुपये सापडल्याच्या मुद्यावरूनही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत, समिती गेल्यानंतर पाहुण्यांना पैसे देण्याची प्रथा अत्यंत निंदनीय आहे. असे प्रकार आता वारंवार घडणार आहेत, असे ही विनायक राऊत यांनी सांगितले. मंत्रीपदी छगन भुजबळ यांना शपथ देवून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे. एकप्रकारे भुजबळ यांना शांत करण्याचे काम राज्य सरकारने केले असल्याची टीका राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली.