केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांच्या अशाच स्पष्टपणे बोलण्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी वाशिममध्ये बोलताना आमदार, खासदार व नेत्यांना उद्देशून केलेलं एक वक्तव्य जोरदार चर्चेत आहे. “आमदार, खासदार आणि नेत्यांनी ठेकेदारांना त्रास देऊ नये,” असं म्हणत त्यांनी कान टोचले. तसेच ठेकेदाराला बुलडोझरखाली टाकेन असं म्हटल्याचा एक किस्साही सांगितला.
नितीन गडकरी म्हणाले, “माझी सर्व आमदार, खासदार आणि नेत्यांना विनंती आहे की, थोडं सहकार्य करा. दबाव आणून ठेकेदारांना त्रास देऊ नका. ठेकेदार चांगलं काम करत नाही. एक ठेकेदार काम सोडून पळून गेला होता. तुम्ही मदत करा, तुम्हाला लागेल तेवढा पैसा माझ्या रस्त्यातून द्यायला तयार आहे.”




“रस्त्याला तडा गेला तर तुला बुलडोझरखाली फेकेन”
“रस्त्यांच्या कामासाठी माझ्याकडे आणि एनएचएआयकडे पैशांची कमतरता नाही. जनतेचं सहकार्य, लोकप्रतिनिधींचं सहकार्य मिळालं तर चांगले रस्ते होतील. मी एका ठेकेदाराला सांगितलं होतं की, रस्त्याला तडा गेला तर तुला बुलडोझरखाली फेकेन. मी ५० लाख कोटी रुपयांची कामं केली आहेत. मात्र, एकाही ठेकेदाराला ठेका मिळवण्यासाठी माझ्याकडे येण्याची गरज पडली नाही,” असंही नितीन गडकरींनी सांगितलं.
हेही वाचा : “फडणवीस, गडकरींच्या विकासाच्या पोकळ गप्पा अन् भाजपाचा भ्रष्ट कारभार उघड”, असे का म्हणाले नाना पटोले? वाचा…
दरम्यान, अकोला जिल्ह्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिवार फेरीच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले, “गावाकडे रस्ते नाहीत. शिक्षण, रोजगार व आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत. शेतकऱ्यांकडे सिंचन सुविधा देखील नसते. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकसंख्या झपाट्याने शहरी भागाकडे वळत आहे. शेतीच्या उत्पादनाला योग्य किंमत मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत येतात. कृषी उत्पादनाला चांगला भाव मिळण्याचा संबंध हा मागणी व पुरवठ्यावर असतो. कृषी तज्ज्ञ स्वामिनाथन यांनी दरवर्षी कृषी उत्पादनाचा हमीभाव बदलावा, असा सल्ला दिला होता. त्यानुसार केंद्र सरकारने तो निर्णय घेतला. मात्र, आता बाजार किंमत व हमीभावात मोठा फरक दिसून येतो. त्याचा भार सरकारवर येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्पादनाची उपलब्धता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची गरज आहे.”
“विदर्भातील कापसाची आता बांगलादेशात थेट निर्यात होणार आहे. त्यामुळे विदर्भाच्या कापसाला चांगला भाव मिळेल. याचा फायदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होईल. सर्व गोष्टींचा विचार करून धोरण ठरवावे लागणार आहे. एकरी उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. राजस्थानमध्ये खारपाणपट्ट्यात तळे तयार करून झिंग्याची शेती करून एकरी ३० लाखाचे उत्पन्न घेतले जाते. अमेरिकेतील कंपनीने त्याठिकाणी मोठी गुंतवणूक केली. तोच प्रयोग आता पश्चिम विदर्भातील खारपाणपट्ट्यात करणार आहे,” असेही गडकरींनी नमूद केले.