Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भाजपातले एक दिग्गज नेते आहेत. अनेकदा ते अशी खास वक्तव्यं करतात ज्यांची चांगलीच चर्चा होते. नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरींनी असंच एक वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान पदाबाबत हे वक्तव्य नितीन गडकरींनी केलं आहे. ज्या वक्तव्याची आता चर्चा रंगली आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले नितीन गडकरी?

“मला चांगलं लक्षात आहे, मी कुणाचंही नाव घेणार नाही. मात्र त्या व्यक्तीने मला सांगितलं होतं, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही पाठिंबा देऊ. मी त्यांना विचारलं की तुम्ही मला पाठिंबा का द्याल? तसंच मी तुमचा पाठिंबा का घेऊ? पंतप्रधान होणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय नाही. मी माझी मूल्यं, विचार आणि माझी संघटना यांच्याशी प्रामाणिक आहे. मी कुठल्याही पदासाठी तडजोड करत नाही. मला माझ्या मूल्यांवर विश्वास आहे. भारतीय लोकशाहीचा आधार असलेली ही मूल्यं आहेत.” असं वक्तव्य नितीन गडकरींनी केलं. ही चर्चा नेमकी कुणाशी झाली? तसंच कधी झाली ? याचे तपशील नितीन गडकरींनी दिले नाहीत. मात्र त्यांचं हे वक्तव्य आता चर्चेत आहे.

हे पण वाचा- नितीन गडकरींचे देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा पत्र; जाणून घ्या नेमका विषय काय?

पंतप्रधान पद मिळवणं हे ध्येय नाही

२०२४ आणि २०१९ या दोन्ही वर्षी ज्या लोकसभा निवडणुका पार पडल्या त्यावेळी नितीन गडकरी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत अशी चर्चा होती. मात्र त्यांनी या चर्चा फेटाळल्या होत्या. २०१९ मध्ये जेव्हा या चर्चा झाल्या तेव्हाही नितीन गडकरी म्हणाले होते की नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदासाठी सक्षम नेते आहेत, मला पंतप्रधान होण्यात काहीही रस नाही. मी पदासाठी नाही तर संघटनेसाठी काम करतो.

सुपारी पत्रकाराचा किस्साही चर्चेत

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकारिता करताना आपल्या मूल्यांचा आपल्याला नक्कीच उपयोग होतो. जशी व्रतस्थ पत्रकारिता आहे, तशी सुपारी पत्रकारितेचीही काही कमी नाही. आज काल राईट ऑफ इन्फॉर्मेशन मिळाला ते चांगलंच झालं. पण त्या निमित्ताने अनेक लोकांनी मर्सिडिज गाड्या विकत घेतल्या. मी महाराष्ट्रात मंत्री असताना एक पत्रकार होते ते पत्रक काढायचे आणि आमच्या PWD च्या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायचे. खेडकर म्हणून अधिकारी होते ते मला म्हणाले जरा बघा ना यांच्याकडे हा पत्रकार आम्हाला ब्लॅकमेल करतो, थोडं लक्ष द्या. मी त्यांना म्हटलं मी लक्ष देणार नाही तुम्हीच द्या. त्यांना मी सांगितलं हा पैसे मागायला आला की त्याला फटके द्या. त्यांनी तसंच केलं. पत्रकार आला यांनी ऑफिसचा दरवाजा लावून घेतला आणि पैसे मागणाऱ्या पत्रकाराला फटके ठेवून दिले. त्यानंतर त्याचं पत्रक निघणं बंद झालं. असा किस्साही नितीन गडकरींनी सांगितला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari told how he once declined an offer from political leader to support his candidacy for pm post scj
Show comments